बारामती प्रतिनिधी, दि. १४: कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित कृषिक तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विविध उपक्रमांना भेट देवून पाहणी केली.
यावेळी आमदार रोहित पवार, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, कृषि महाविद्यालयाचे प्रा. निलेश नलवडे आदी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, सध्या युवा पिढीचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. शेतीचे व शेतीआधारीत तंत्रज्ञान राज्यातील मुलांना देण्यासाठी हे प्रदर्शन उपयोगी आहे. कोकणातील युवकांना रोजगार विषयक मार्गदर्शनासाठी प्रदर्शनाला दिलेली भेट उपयुक्त ठरेल. माती विना भाजी फळे पिकविण्याच्या तंत्रासह अनेक नव्या गोष्टी इथे पाहायला मिळाल्या.
मंत्री सामंत यांनी ११० एकर वरील प्रात्यक्षिके पहिली. त्यांनी नेहरू सायन्स सेंटर येथे विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू असलेल्या प्रदर्शनाची तयारी पहिली. भाजीपाला गुणवत्ता केंद्रामधील माती विना शेतीचे प्रयोग, तसेच स्टार्ट अप दालनामधील विद्यार्थ्यांनी व शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग आणि पशु पक्षी प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली.
महाराष्ट्र वखार महामंडळामार्फत उभ्या करण्यात येणाऱ्या गोडाऊनचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.