वंचितांच्या उत्थानासाठी लोकसहकार्याची गरज – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सावंगीच्या सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण

वर्धा प्रतिनिधी, दि. १४ : समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकासाठी लोकसहभागातून सेवाकार्य निर्माण करणे आवश्यक आहे. सरकारलाही काम करताना मर्यादा असतात. अशावेळी सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हे शक्य होते. गोरगरीबांची सेवा करण्याच्या दृष्टीने मेघे समूहाने आजतागायत केलेले कार्य ही मोठी देण आहे, असे गौरवोद्गार भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सावंगी येथे दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळ्यात काढले.

या लोकार्पण समारोहाच्या अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे कुलपती व रुग्णालय समूहाचे संस्थापक दत्ता मेघे होते. महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, खासदार रामदास तडस, आ. रणजित कांबळे, आ. समीर कुणावर, आ. दादाराव केचे, आ. डॉ. पंकज भोयर, धामणगावचे आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, विश्वस्त सागर मेघे, आ. समीर मेघे, प्रतिभा गुप्ता, राधिका गुप्ता, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्रकुलगुरू डॉ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन भोला, मुख्य कार्यवाह अधिकारी डॉ.जॉर्ज फर्नांडिस, डॉ.श्वेता काळे पिसुळकर यांची उपस्थिती होती.

प्रारंभी श्री.गडकरी यांच्या हस्ते कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील अद्यावत वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. उद्घाटनानंतर विद्यापीठ सभागृहात आयोजित समारोहात बोलताना श्री.गडकरी म्हणाले, आज विविध क्षेत्रातील संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. भविष्यकाळाची ती गरज आहे. नवसंशोधनाची व नवनिर्मितीची भारतीय तरुणांमध्ये क्षमता आहे. कोरोनासंदर्भात मेघे अभिमत विद्यापीठाने केलेले संशोधनकार्य उल्लेखनीय आहे. त्यासोबतच, या कोरोना काळात सावंगी रुग्णालयाने असंख्य लोकांचे प्राण वाचविले. आपले हे योगदान समाज कधीही विसरू शकणार नाही. आजच्या काळात मुलांना आईवडिलांचा विसर पडतो, अशावेळी दिवंगत मित्राचे नाव प्रेमापोटी एका मोठ्या रुग्णालयाला दिले जाते, हे सामाजिक संस्कार आहेत, असे उद्गार ना. गडकरी यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *