सर्वांच्या आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्यासाठी ग्रामसमृद्धी

याच कार्याबरोबर जीवनविद्या मिशन ही शासनासोबत ग्राहक संरक्षण, अवयव दान, विविध व्यसनांच्या दुष्परिणाबाबत जागृतीसह गावांचा सर्वांगीण विकास करणे व सर्वच बाबतीत दत्तक घेतलेली गावे आदर्श गाव बनविणे या उद्देशाने ग्रामसमृद्धी अभियान तसेच शेतकरी आत्महत्या थांबविणे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून मानसिक सबलीकरण असे अनेकविध अभियाने संयुक्त विद्यमाने राबवित आहे. त्याचबरोबर विविध कार्पोरेट व सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्येही अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी  Enjoy Your Work, Stress Management या विषयाबाबतच्या कार्यशाळा आयोजित करून जीवनविद्या मिशन कार्य करीत आहे.

भारत देशाचा केंद्रबिंदू असलेल्या खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जीवनविद्या मिशनने ६० गावे दत्तक घेतली असून त्यापैकी २० गावांमध्ये जीवनविद्या मिशनने कार्य सुरु केले आहे. त्यातील ४-५ गावांमध्ये अतिशय परिणामकारक बदल दिसून आले. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगीण विकास करणे व ते गाव सर्वच बाबतीत आदर्श गाव बनविणे याकरिता ग्रामसमृद्धी अभियान राबविणेबाबतचा प्रस्ताव जीवनविद्या मिशनने शासनास सादर केला आणि जीवनविद्या मिशनने केलेल्या कामांची दखल घेत त्यास मान्यता दिली.

याअन्वये आता प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी व समृद्ध करून प्रत्येक गाव सक्षम करत गावातील भौतिक विकासासाठी सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी संस्था, उद्योग समूहाचे आर्थिक सहकार्य मिळवून, गावातील भौतिक विकास कामे करण्याकरिता जीवनविद्या मिशन या संस्थेचे प्रशिक्षित कार्यकर्ते हे कार्य करणार आहेत. यासाठी हे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आणि त्याचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करतील. या अहवालाचे नियोजन ग्रामपंचायतीसोबत सभा करून पुढील उद्दिष्टांवर भर देऊन कार्य करणार आहे.

यात स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, हागणदारी मुक्त गाव, प्लास्टिक बंदी, शून्य कचरा मोहीम, घनकचरा व्यवस्थापन, गाव व आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्त्री सन्मान, बेटी बचाव व बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण व सरकारी योजनांचे मार्गदर्शन, गावागावांत रोजगार वाढीस लागावा व गावाकडून शहराकडे नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी येणारा लोंढा स्थानिक पातळीवरच आपले अर्थार्जन करू शकेल, या उद्देशाने स्थानिक पातळीवर स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे. आवश्यक असल्यास त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे ही महत्त्वाची उद्दिष्ट्ये असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी वर्गाला संघटित करून सेंद्रीय शेती करण्याचे प्रशिक्षण देणे व सेंद्रीय शेती, जोड धंदा, कुटीर उद्योग करण्यास प्रवृत्त करणे, सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे व राबविणे, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करणे, ग्रामसमृद्धी अभियान अंतर्गत गावागावांमध्ये भौतिक विकास साधण्यासाठी सामाजिक दायित्व निधी (CSR) उपलब्ध करून देणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर परंतु मोजका वापर करण्यास शिकवणे, त्याचबरोबर संपूर्ण व्यसनमुक्त गाव, संपूर्ण अंधश्रध्दामुक्त गाव, प्रत्येक घर सुखी करणे, संस्कार युक्त गाव, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रहीत भावना वृद्धींगत करुन उत्कृष्ट नागरीक घडवणे, गावांतील भौतिक विकास कामांना सरकारी योजना व उद्योग समुहांच्या सहकार्याने गती देणे यावरही भर देण्यात येणार आहे.

शासनाशी समन्वय ठेवण्याचे कामही जीवनविद्या मिशन करणार असून प्रत्येक गावामध्ये चालत असलेल्या सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी, शैक्षणिक संस्थामध्ये आठवडयातून एक तास प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने एक तास मानवी जीवनमूल्यांचे संस्कारयुक्त प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहेत. तसेच ग्रामस्थ, व्यावसायिक, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता बदलण्यासाठी जीवनविद्या तत्वज्ञानाचे मूल्यात्मक संस्कार, शिक्षण ज्ञान, विविध विषयांवरील कार्यशाळा सर्व स्तरांपर्यत पोहचविण्यासाठी मदत करणार आहे.

जीवनविद्या मिशनला ही कामे सहजरित्या करता यावीत म्हणून या संस्थेची “सहयोगी मार्गदर्शक संस्था” म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यापुढे ग्रामसमृद्धी अभियान राबविल्याने  ग्रामस्थांच्या विचारसरणीत नक्कीच परिणामकारक बदल होऊन गावातील प्रत्येकाचा मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि शारीरिक स्तर उंचावणार आहे.

जीवन विद्या मिशन, मुंबई या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रामसमृद्धी अभियानासाठी येणारा खर्च सरकारी योजनेतून करता येणार नाही. त्यामुळे सदर खर्च जीवन विद्या मिशन, मुंबई या संस्थेने किंवा लोकवर्गणी मधून करण्यात येईल, असेही ग्रामविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे.

महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे तसेच राज्यातील गावे सर्वच बाबतीत आदर्श बनविण्याचे माझे स्वप्न असून प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी, समृद्ध व सक्षम करण्यासाठी तसेच दत्तक घेतलेली गावे ही आदर्श गावे बनविण्यासाठी जीवनविद्या मिशन, मुंबई आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियान राबविण्यात येत असल्याचे समाधान असल्याचे सांगून ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आपण सर्वांनी हे ग्राम समृद्धी अभियानाचे कार्य पद्धतशीरपणे यशस्वी होण्यासाठी आणि ही सर्व उद्दिष्ट्ये साध्य करून प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यासाठी जीवनविद्या मिशन यांना ग्रामीण भागात कार्य करण्यासाठी सहकार्य करू या !

 

संजय डी.ओरके,

सहायक संचालक (माहिती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *