सिल्लोड – सोयगाव तालुक्याच्या विकासासाठी जलसंधारण प्रकल्पांच्या कामांना गती द्या – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद प्रतिनिधी, दिनांक १५: निजामकालीन पाणी वितरण व्यवस्था व दोन्ही तालुक्यातील असलेल्या जलसंपदा प्रकल्पाबाबतचे अंदाजपत्रक तयार करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत दिल्या.

बैठकीस कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ किरण कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता श्री.पाटोळे, श्री.आवलगावकर, कार्यकारी अभियंता श्री.गोडसे, श्री.निंभोरे, उपअभियंता आदींची उपस्थिती होती.

सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील नाणेगाव, जंजाळा, अंभई या प्रकल्पाच्या दुरुस्तीबरोबरच शिवना आणि भराडी धरणाच्या पाण्याचा उपयोग सिल्लोड तालुक्याच्या विकासासाठी करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने ग्रामविकास व महसूल विभागाच्या समन्वयातुन  करावे. तसेच धरणातील गाळ काढून काढलेला गाळ शेतीसाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे नियोजन देखील करावे. हळदा, जळकी आणि निल्लोड या प्रकल्पांची हस्तांतर प्रक्रिया आणि पाणी साठवण क्षमता वाढीसाठी प्रकल्पाची उंची वाढविण्याचे सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देत  जल आराखड्यात पाण्याचा समावेश, दुरूस्तीचे प्रस्ताव तयार करणे व ते जल परिषदेकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश देखील राज्यमंत्री सत्तार यांनी दिले.

जलसंधारणाच्या प्रस्तावांची दर सहा महिन्याला पाठपुरावा करुन सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याला शेतकऱ्याला पाण्याचा हक्क मिळवून दिल्याने दोन्ही तालुक्यातील नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या  आत्महत्या थांबतील व शेतीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. शासनाच्या जलसंपदा विभागाच्या सर्व प्रकल्पांची मालमत्ता नोंदवहीत नोंद घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.सत्तार यांनी यावेळी दिले. स्थानिक क्षेत्र विकासासाठी वेळेत निधी खर्च करुन शेतकऱ्यांना अडविलेले पाणी शेतीसाठी उपलब्ध करावे. तसेच इतर अनुषंगिक बाबींचा आढावा बैठकीत श्री.सत्तार यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *