नागपूर येथे २५ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय महसूल परिषद

नागपूर प्रतिनिधी, दि. १८ : नागपूर विभागातील महसूल अधिकाऱ्यांसाठी येथे २५ आणि २६ फेब्रुवारीला महसूल परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी चंद्रपूर येथे आज बैठकीत आढावा घेतला.

चंद्रपूर येथील वन अकादमीत झालेल्या या बैठकीस विभागातील अजय गुल्हाने (चंद्रपूर), आर. विमला (नागपूर), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), संजय मीणा (गडचिरोली), डॉ. संदीप कदम (भंडारा) या जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल उपायुक्त मिलिंद साळवे तसेच विद्युत वरखेडकर (चंद्रपूर) आणि  राजेश खवले (गोंदिया) हे अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त यावेळी म्हणाल्या, महसूल अधिका-यांमार्फत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी व वेळेत काम पूर्ण होण्यासाठी ही महसूल परिषद अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. यात विविध प्रशासकीय बाबींबाबत चर्चा करण्यात येणार असल्याने त्याचा अधिका-यांना दैनंदिन कामकाजात लाभ होईल. आपत्कालीन परिस्थितीत सर्वच प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी काम करतात. मात्र दैनंदिन कामकाज करताना महसूलविषयक बाबींकडे दुर्लक्ष होता कामा नये, याबाबत सर्वानी सजग राहणे गरजेचे आहे.

या परिषदेमध्ये महसुली कायद्याच्या तरतुदींची प्रकरणे, गौण खनिज सुधारणा व तरतुदी, जमिनविषयक बाबी (भूसंपादन सोडून), अधिकारी अभिलेख संगणकीकरण, वित्तीय व आस्थापनाविषयक बाबी आणि भूसंपादन व मूल्यांकन या विषयांवर सादरीकरणातून चर्चा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिका-यांवर  जबाबदारी देण्यात आली आहे.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून सामान्य नागरिकांचा या विभागाशी दैनंदिन संपर्क येतो. नागरिकांना अधिक सुलभ पध्दतीने गतिमान सेवा देण्यासाठी नागपूर विभागाच्या अधिका-यांसाठी या महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला विभागातील  सहाय्यक जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार निलेश गौंड, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम आदींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *