मुंबई प्रतिनिधी, दि. २१ :- मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा दिला. ‘दर्पण’ वृत्तपत्रातून त्यांनी समाज घडविण्याचे कार्य केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान व कार्य मार्गदर्शक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त काल म्हणजेच २० फेब्रुवारीला अभिवादन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकशिक्षण, ज्ञानप्रसाराच्या उद्देशाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील दिलेले योगदान प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणांना त्यांनी विरोध केला. वृत्तपत्र हे समाजप्रबोधनाचे, राष्ट्र घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.