मानवी मूल्यांची जपणूक करणारी कविता : अभंग समतेचे

‘अभंग समतेचे ‘ हा कवी चंद्रकांत गायकवाड यांचा पहिलाच काव्यसंग्रह. मराठी संतांनी सुरू केलेला हा काव्यप्रकार पुढे केशवसुत, मर्ढेकर, दिलीप चित्रे, अरुण कोल्हटकर, फ. मु. शिंदे या नामवंत कवींनी हाताळला. याच परंपरेचा धागा पकडून अभंगरचना करणारे कवी म्हणजे चंद्रकांत गायकवाड होत. मराठी संतांनी आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी प्रामुख्याने अभंगरचना केली. कवी गायकवाड यांनी सामाजिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी अभंग रचना केल्याचे दिसून येते. चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून बदलत्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कौटुंबिक नातेसंबंधावर मार्मिक भाष्य केले आहे. त्यांची अभंग रचना प्रामुख्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आविष्कृत होते. समाजातील विसंगती, राजकीय दंभ, स्त्रियांचे प्रश्न, भूक, दारिद्र्य, गरिबी, नात्यातील दुभंगलेपण हा त्यांच्या अभंगाचा मुख्य विषय आहे.गायकवाड यांची कविता वैचारिक आहे. जीवनाबद्दलच्या वैचारिक आणि भावनिक जाणीवांतून ती जन्माला येते. जाणिवांच्या या दोन पातळ्यांपैकी पहिली पातळी महात्मा गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांची आहे ; तर दुसरी पातळी सर्वसामान्य माणसांच्या वेदनेशी नाते सांगणारी आहे. त्यामुळे चिंतनशीलता आणि वैचारिकता हे त्यांच्या कवितेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यामुळेच की काय ती कधी-कधी दुर्बोध वाटायला लागते. पिंपळ प्राण, विवेकाचे झाड, स्वार्थाचे कोलीत  यांसारख्या असंख्य प्रतीकांच्या माध्यमातून विचारांचे एकावर एक थर रचित जावे त्याप्रमाणे एकामागून एक विचार त्यांच्या कवितेत प्रकट होतात. उदाहरणार्थ ‘विवेक’ या कवितेत ते लिहितात.
   “धरणीचा धर्म
    एकरूप जाण
    पिंपळ हा प्राण
    मातीमूळ”
माती मानवाला एकरुपतेची शिकवण देते. त्याप्रमाणे माणसानेही आपल्यातील भेदाभेद विसरून एकात्मता धारण करावी असे कवीला वाटते. यात ‘पिंपळप्राण’ हे ज्ञानाचे प्रतीक म्हणून येते. गौतम बुद्धाला पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञान म्हणजे विवेक आणि विवेकाची अत्युच्च अवस्था म्हणजे एकात्मता होय. संदर्भ आणि आशय त्यांच्या अभंगरचनेतून जागोजाग सूचित होतो. त्यामुळे संदर्भ आणि आशयसूचकता हे या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.गायकवाड यांची कविता समाजसुधारकांच्या विचारांचा जागर मांडते. ती कर्मकांडावर व ढोंगी प्रवृत्तीवर प्रहार करते. देवाधर्माच्या नावावर बडव्यांकडून आणि दलालांकडून भक्तांची होणारी कुचंबना त्यांना वेदनादायी वाटते. देवाच्या या दलालांना किती भाव द्यावा हा प्रश्न त्यांना सतावतो. दिवस-रात्र देवाच्या गाभाऱ्यात पूजा-अर्चा करणाऱ्या या माणसांना स्वतःच्या मनाचा गाभारा मात्र शुद्ध ठेवता येत नाही, हे वास्तव कवी प्रखरतेने मांडतात. त्यांच्या मनाची ही ठसठस निरंजन, वेदना, मृगजळ, गहिवर, पुस्तक, प्रकाश, या कवितांतून प्रत्ययकारीपणे अभिव्यक्त झाली आहे. म्हणून ते ‘वेदना’ या कवितेत लिहितात,
     “राऊळी दंभाच्या
      पेटल्या दिवट्या
      धर्माच्या कुपाट्या
      लावलेल्या”
आपल्या संतांनी आणि समाजसुधारकांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला असला ; तरी देवाच्या नावावर माणसा-माणसात केला जाणारा भेदभाव थांबला नाही. प्रस्थापित व्यवस्था लोकांना अनीतीचा भांग पाजवून आपल्या तालावर नाचवते. आपल्या लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर व्हावी हे सांगायलाही ते विसरत नाहीत. ते म्हणतात ,
    “उद्धार नाही हो
     देव दर्शनात
     पहा पुस्तकात
     विश्व सारे”
देवदर्शनापेक्षा समाजाचे कल्याण पुस्तकातच दडले आहे. त्यामुळे भोळ्याभाबड्या समाजाने विवेक धारण करुन पुस्तकी ज्ञानाचा अंगीकार करावा असे कवीला वाटते.
     या अभंगाच्या माध्यमातून कवीने आपल्या समाजातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. आज आदर्श कुणाचा मानावा हेच कळत नाही. ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पहावे त्यांचे हात कुठेतरी भ्रष्टाचाराच्या आणि अनैतिकतेच्या दलदलीत फसल्याचे चित्र दिसते. अशा मतलबी माणसांच्या ढोंगीपणावर ताशेरे ओढताना कवी लिहितात ,
     “झेंडा खांद्यावर
       हरी मुखी नाम
       करी कर्म वाम
       मतलबी”
     त्यांच्या काही कवितेत शेतकऱ्यांच्या दुःखाचे ज्वलंत चित्रण येते. यादृष्टीने लेक, निरंजन, नक्कलाकार, भारतीय या कवितांचा उल्लेख करावा लागेल. लेक या कवितेत उभे पीक डोळ्यासमोर करपून गेल्याने हवालदिल झालेला शेतकरी दिसतो. सावकारी कर्जाचा फास, व्यापारी व दलालांची कपटनीती, सरकारची नियोजनशून्य धोरणे, निसर्गाचा लहरीपणा यामुळे लेकीचे लग्न कसे करावे या विवंचनेत असलेल्या शेतकरी बापाचे दुःख वाचकांच्या अंतःकरणाचा ठाव घेते. उपवर लेक, आसुसलेली माती, भुकेजलेली गाय या शब्दांतून ही वेदना अधिकच कातर बनत जाते. यामुळे बापाच्या मनाला होणाऱ्या यातना मरणप्राय असल्याचे कवीच्या संवेदनशील मनाला जाणवते. म्हणून ते लिहितात-
    “वाटे यम सदा
     दारावर उभा
     काळजाला बिबा
     लागलेला”
‘काळजाला बिबा लागणे’ या वाक्प्रचारातून ही वेदना अधिकच गडद होते. भूमीच्या मालकाला केवळ काबाडाचा धनी बनवल्या गेल्याचे वास्तव कवीला विषण्ण करते. जगाच्या पोशिंद्याला स्वतःच्या लेकराचे तोंड मारावे लागणे ही आपल्या कृषिसंस्कृतीची घोर विटंबना आहे. स्वतःच्या घामातून इतरांचे जीवन फुलवणाऱ्या या लक्ष्मीपुत्राला सदासर्वदा कर्जातच राहावे लागते, हे भयाण वास्तव कवी अत्यंत पोटतिडकीने मांडतात.
     गायकवाड यांची कविता मानवी नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याबरोबरच ती माणुसकीची मूल्ये माणसात रुजावीत यासाठी करूणा भाकते. जगणं सुंदर व्हावं यासाठी निसर्गानं निर्माण केलेलं सुंदर रूप म्हणजे नातं. पण याच नात्याला जेव्हा स्वार्थ आणि अहंकाराचा डंख लागतो तेव्हा हे नातं वैराण वाळवंटासारखं वाटतं. माळेतील मणी विस्कटून जावेत त्याप्रमाणे ते विस्कटून जातं. नात्यातील ही संवेदनहीनता  त्यांच्या सालोंसाल, नातं  या कवितेतून उत्कटतेने  चित्रित झालेली आहे. ‘सालोंसाल’ या कवितेत ते लिहितात-
     “माय बाप भाऊ
     आभाळी चांदणे
     मनाची स्पंदने
     थांबलेली”
मानवी नातेसंबंधातील ही घुसमट वरील ओळीतून शब्दबद्ध होते. आज कुठल्याच नात्यात ओलावा राहिला नाही. नाती केवळ नावापुरतीच उरली आहेत. नातेसंबंध तरल असतात. ते आरशासारखे पारदर्शी असावेत असे कवीला वाटते. सध्याच्या भौतिक पसाऱ्यात जग जवळ आले पण माणूस माणसापासून दूर गेल्याची जाणीव कवीला अस्वस्थ करते.
     भूक, दारिद्र्य हाही कवींच्या चिंतनाचा विषय आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातही येथील भाकरीचा प्रश्न मिटू नये याबद्दल कवी मनाला खंत जाणवते. संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. परंतु त्यांची ही प्रार्थना आजही पूर्ण होऊ शकली नाही. उलट ती भंग पावल्याचे विदारक दृश्य कवींच्या अनुभवाला येते. म्हणून ‘रोटी’ या कवितेत ते लिहितात –
    “भाकरीची भीक
     मागे भारतीय
     ज्ञानेशा पसाय
     भंगलेले”
‘पसायदान भंग पावणे’ या नाविन्यपूर्ण वाक्प्रचारातून कवींच्या मनाची तगमग उत्कटपणे व्यक्त झाली आहे.
     बदलत्या राजकीय परिस्थितीचे वास्तवदर्शी दर्शन ही कविता घडविते. सध्याच्या राजकारणातील विरोधाभास, विसंगती आणि विकली गेलेली प्रसारमाध्यमे यांचा उपरोधिक भाषेतून घेतलेला समाचार हा कवींच्या चिंतनशील राजकीय मनोवृत्तीचा आविष्कार म्हणावा लागेल. सध्याचे गढूळ राजकारण पाहून राष्ट्रद्रोह कशाला म्हणतात हेच नीट कळत नाही. सत्तेसाठी राजकारणाचा डाव खेळणाऱ्यांनी  राष्ट्रद्रोह्याची केलेली व्याख्याही कवीला संशयास्पद वाटते. म्हणूनच ते ‘नटेश्वर’ या कवितेत लिहितात-
     “पावतो कुणाला
      मतलबांचा धनी
      राम ना वर्तनी
      नटेश्वरा”
राजकारण हे खुर्चीसाठीच असते. विकासाच्या गंगेची वाट पाहणाऱ्या लोकांना ढोंगी राजकारण्यांचा मतलबी चेहराच अनुभवास येतो, हे वास्तव कवी प्रखरतेने मांडतो.
     गायकवाड यांची अभंगरचना मानवतावादाचा पुरस्कार करते. या अभंगरचनेवर महात्मा गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांचा गडद प्रभाव आहे. त्यामुळे ती  स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा पुरस्कार करतानाच मानव्याचे गाणे गाते. ही मानवतेची मूल्ये पायदळी तुडवल्याचे पाहून ती संताप व्यक्त करते. प्रसंगी विद्रोहाची भाषा बोलते. शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्षाचे चित्रण करतानाच ती सारासार विचारांचे प्रतिपादन करते. याचे उदाहरण म्हणून सिद्धनाक, शाक्य, चक्रवर्ती, प्रज्ञावंत, संविधान, भीमराव, शिवराय या कवितांचा उल्लेख करावा लागेल.
     ‘सिद्धनाक’ या कवितेला भीमा-कोरेगाव लढाईचा ऐतिहासिक संदर्भ आहे. या कवितेला कुठलाही जातीय रंग नाही. मानवतेच्या हक्कासाठी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्धचा हा संघर्ष आहे. यात विजय कुणाचा आणि पराभव कुणाचा हे महत्त्वाचे नाही. अंतिमतः मानवी मूल्यांची रुजवणूक करणे हे या लढ्याचे उद्दिष्ट होते. सिद्धनाकचा पराक्रम हा मानवतेच्या प्रतिष्ठापनेसाठी होता. जातीय किंवा धार्मिक दृष्टीने या लढ्याकडे न पाहता मानवतेच्या भूमिकेतून त्याकडे पहावे ही कवींची प्रांजळ भावना आहे. ही भावना व्यक्त करताना ते लिहितात-
    “माणसांचा गाव
     उभारू नव्याने
     पशूचे वागणे
     नको आता”
     ‘चक्रवर्ती’ या कवितेत सम्राट अशोकाच्या लोककल्याणकारी कार्याचे वर्णन येते. महाकाय साम्राज्याच्या सुयोग्य प्रशासनासाठी सम्राट अशोक ओळखला जातो. परंतु समाजात अशा काही व्यक्ती असतात की

ज्यांना समाज विकलांग करण्यातच मोठे समाधान लाभते. पुष्यमित्र शुंग याचे प्रतीक म्हणून या कवितेत येतो. शुंग याने मौर्य आणि बौद्ध धर्माचा केलेला अंत हा नैतिक विकासाला खीळ घालणारा वाटतो. शुंगाच्या प्रवृत्तीची असंख्य माणसे आजही आपल्या समाजव्यवस्थेत आहेत. समाजातील ही शुंग प्रवृत्ती नाहीशी व्हावी, असा आशावाद या कवितेतून व्यक्त होतो.
     ‘प्रज्ञावंत’ ही कविता बुद्धाच्या करुणेचा संदेश देणारी आहे. रोहिणीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलियातील संघर्ष हा शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्ष म्हणूनच येतो. कोलियांची अतिमहत्वाकांक्षा हेच या संघर्षाचे मूळ आहे. जिथे स्वार्थ आहे, तिथे संघर्ष आहे हा इतिहास आहे. ही कविता आजच्या परिस्थितीतही  उद्बोधक ठरते. स्वार्थ ही माणसांची दुष्ट प्रवृत्ती आहे. मानवी मनावर दीर्घकाळ जखमा करणाऱ्या या अनिष्ट प्रवृत्तीवर महात्मा गौतम बुद्धाने सांगितलेली करुणा हेच प्रभावी औषध असल्याचे कवीला जाणवते. म्हणूनच ते म्हणतात-
    “तृष्णाच दुःखाच्या
     जखमा जालीम
     करुणा मलम
     दु:खावरी”
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच दलित साहित्याचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकरांबद्दलचा श्रद्धाभाव दलित साहित्यातून प्रकट होतो. गायकवाड यांच्या अभंग रचनेतूनही हा श्रद्धाभाव जागोजाग प्रकट होतो. आज समाजाच्या विविध स्तरात टोकाचे संघर्ष पेटले आहेत. धर्मांधता, जातीयवाद आणि द्वेष पसरवणारी संघटित विचारधारा वाढते आहे. याचा परिणाम म्हणून समाजात हिंसक प्रवृत्ती बळावते आहे. कवीला समाजाचे हे दुखणे विषारी वाटते. या विकारी दुखण्यावर डॉ. आंबेडकर यांनी समाजाला दिले सर्वोत्तम दान म्हणजे ‘संविधान’ असल्याचे कवीला वाटते. संविधानाचे आचरण म्हणजे मानवजातीचा ‘आत्मीय सोहळा’ असल्याचा प्रत्यय कवीला येतो. म्हणून ते म्हणतात –
    “उतारा औषध
     संविधान जाणं
     हेची जगा दान
     भीमराया”
     अल्पाक्षर रमणीयता हे गायकवाड यांच्या अभंगरचनेचे वैशिष्ट्य म्हणता येईल. अभंगाच्या छोट्या-छोट्या तुकड्यातून चिंतनशील आणि वास्तवदर्शी आशय मांडण्याचे कवीचे कसब वाखाणण्याजोगे आहे. ऐतिहासिक पुरुषाचे आणि इतिहासाचे दाखले देत ही कविता वर्तमानातील मानवी मनाचा शोध घेते. या अभंगातून त्यांचा समाजाकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टिकोन प्रत्ययाला येतो. समाजाचे दुभंगलेपण पाहून त्यांचे मन विव्हळते. प्रसंगी या दुभंगलेपणास जबाबदार असणाऱ्यांवर कडाडून प्रहार करते. ही कविता नव्या समाजरचनेचे स्वप्न पाहते. ‘अभंग समतेचे ‘ म्हणजे कवीच्या मनाला झालेल्या जखमांचा हुंकार आहे. त्यामुळे समाज मनाची घुसमट शब्दबद्ध करणारी, संविधानाला प्रमाण मानून मानवतावाद हे सर्वोच्च मूल्य मानणारी आणि समाजातील खदखदणारे  वास्तव अभिनिवेशाने मांडणारी उत्कृष्ट वास्तवदर्शी रचना म्हणूनच या अभंगाचा उल्लेख करावासा वाटतो.
     कवींच्या पुढील लेखनास शुभेच्छा !
               ‘अभंग समतेचे ‘
    कवी : चंद्रकांत गायकवाड
     गणगोत प्रकाशन , देगलूर
               मूल्य : १५०रु .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *