नवी दिल्ली, दि. ०१ : शालेय शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
पुणे, उस्मानाबाद, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या सहा शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी)वतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये “वर्ष २०१८ आणि २०१९ च्या राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार” वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहसचिव एल.एस.चांगसान, एनसीईआरटीचे संचालक प्रा. दिनेश प्रसाद यावेळी उपस्थित होते.
शैक्षणिक मोबाईल ॲप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, सॉफ्टवेअर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी देशभरातील २५ शिक्षकांना वर्ष २०१८ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. तर, देशभरातील २४ शिक्षकांना वर्ष २०१९ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले, यातही राज्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.