गावातच रोजगार निर्मिती झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल व गाव सक्षम बनेल 

नागपूर,दि. ०१ :  जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून गावात रोजगार निर्मिती करण्याचे ठरविले आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊन गाव सक्षम बनेल. गावातच उद्योग व व्यवसाय निर्माण झाल्यास शहराकडे येणारा तरुणांचा लोंढा गावात थांबेल. गाव विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट होईल. सरपंच व ग्रामसेवकांनी समन्वयातून काम करुन शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून दिल्यास सक्षम गाव निर्मितीला चालना मिळेल. यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊन  गावाचा विकास होईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले.

भिवापूर येथे ग्रामविकासाचे शिलेदार व दोनदा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सरपंच  भास्करराव पेरे पाटील यांचे ग्राममविकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजू पारवे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, दुधराम सव्वालाखे, सुरेश भोयर, नंदा नन्नावरे, मनोहर कुंभारे, चंद्रपाल चौकसे, प्रकाश नागपूरे, अधिक कदम, दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्य शंकर दडमल यावेळी उपस्थित होते.

पशुसंवर्धन विभागाचा ग्रामीण रोजगार निर्मिती हा पायलट  प्रोजेक्ट आहे. हा यशस्वी झाल्या संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही श्री. केदार म्हणाले. विकासाची परिभाषा वेगवेगळी असते. शासनाच्या योजना, रस्ते विकास, पाणी पुरवठा आदी योजनांसाठी लोकप्रतिनिधीचा आग्रह असतो. परंतु ग्रामपंचायत सक्षम कशी होईल याचा ध्यास घेवून शंकर दडमल यांनी सरपंच पेरेपाटील यांचे व्याख्यान आयोजित करुन सरपंचाना दिशानिर्देश दिले, असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यकाळात ‘गाव बनाव देश बनाव’ चा नारा दिला होता. गाव सक्षम होईल तरच देश सक्षम होईल, असे विचार गांधींजींनी मांडले होते. त्याचाच आधार घेवून पेरे पाटीलांच्या मागदर्शनाचा लाभ घेवून प्रत्येक ग्रामपंचायत सरपंचानी  काम केले तर गाव सक्षम होण्यास वेळ लागणार नाही. तरुणांचा लोंढा शहराकडे गेल्यामुळे गाव ओसाड पडायला लागली आहेत. यावर उपाय म्हणून गाव व्यवहारक्षम बनविणे व आर्थिक दृष्टया सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भास्करराव पेरे पाटलांनी ग्रामविकास या विषयावरील व्याख्यानात ग्रामपंचायत सक्षम बनविण्यासाठी त्यांनी आर्थिक नियोजन, सेवाभाव, स्वच्छ पाणी, फळझाडे, शिक्षण व स्वच्छता आणि वृध्दांची सेवा या महत्वपूर्ण बाबी अंर्तभूत असल्याचे त्यांनी सांगितले.

गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी कार्य करा. महिला सरपंचांना पाटोदा आदर्श गावाच्या दौऱ्यावर आणा. कारण महिला ही चौकस व व्यवहार्य असते. विकासाच्या प्रक्रीयेत महिला आघाडीवर असून तीच्याद्वारे गामविकासाचे काम गतीने होते, असे त्यांनी सांगितले.

सरपंचानी ग्रामस्थांच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. आरोग्याच्या बाबीवर लक्ष न दिल्यामुळेच आज मानवाचे आयुष्यमान कमी झाले आहे. स्वत:चे काम स्वत: करा, महिलांचा सन्मान करा. महिला आनंदी तर गाव आनंदी, गावात झाडे व फळझाडे लावा, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे वातावरण शुध्द  होऊन  ऑक्सीजनचा जास्तीत जास्त पुरवठा होईल. ऑक्सीजनच्या अभावामुळे कोरानाच्या काळात अनेकांची जीव गेले म्हणून याचे महत्व ओळखा. माझ्या पाटोदा गावात ५ हजार कर भरुन सर्व सुविधा देण्यात येतात. याच धर्तीवर आपण काम करुन गावाचा विकास साधा, असेही ते म्हणाले.

गाडगेबाबांच्या स्वप्नाचीपूर्ती करुन शासनाच्या योजना गरजवंतापर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी सरपंचांना केले. साडपाणी व्यवस्थापन निट करा. त्यातूनच अनेक आजारांचा जन्म होतो. ग्रामपंचातीचा हिशोब नागरिकांना विश्वासात घेवून सादर करा, कराचा लाभ नागरिकांना दया. सरपंचांनी आपल्या अधिकाराचे महत्व ओळखले पाहिजे, तरच गावाचा विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार राजू पारवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक जिल्हा परिषद सदस्य शंकर दडमल यांनी केले.

प्रारंभी थोर महात्मांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करुन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री. केदार यांच्या हस्ते भास्करराव पेरे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी, नागरिक, महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *