तलाव ठेक्याने घेणाऱ्या राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा
मुंबई, दि. १० : कोरोना प्रादुर्भाव काळात राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव-जलाशयांची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी राज्यात घोषित लॉकडाऊनमुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही, तसेच उत्पादित मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मच्छीमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव आणि जलाशयांची चालू वर्ष सन २०२१-२२ ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी दि.१ मार्चपासून दि.३० एप्रिलपर्यंत दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मच्छिमार बांधवांना दिलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.