लोककलेच्या माध्यमातून योजनांचा जागर उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

ठाणे दि. १३ : लोककलेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. आज मुरबाड तालुक्यातील खेवारे या दुर्गम भागात जल सिंचन योजनेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत कलापथकातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
श्रावस्ती नाट्य संस्थेतर्फे मुरबाड तालुक्यातील मुरबाड बसस्थानक, म्हसा, नारीवली, धसई खेवारे या ठिकाणी कार्यक्रम झाले. आजच्या दिवसातील शेवटचा कार्यक्रम खेवारे येथे होता. त्या ठिकाणी वसुधंरा संस्थेतर्फे सुरु करण्यात आलेल्या जल सिंचन योजनेचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमापूर्वी  कलापथकाने राज्यातील महाविकास आघाडी शासनाने दोन वर्षात केलेल्या जनसेवेच्या कामांची आणि योजनांची माहिती दिली.
दरम्यान, या लोकार्पण सोहळ्यात या भागातील माजी आमदार दिगंबर विशे यांनी कलापथकाने केलेल्या सादरीकरणाचा उल्लेख केला आणि प्रभावी सादरीकरणातून शासनाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना दिल्याचा त्यांनी आर्वजून उल्लेख केला. हाच धागा पकडत पालकमंत्री श्री.शिंदे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या जनजागृती मोहिमेचे कौतुक केले आणि शासनाच्या योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी कलापथकातील कलाकारांना शुभेच्छाही दिल्या.
ठाणे जिल्ह्यात आज जन्नत मिडीया प्रोडक्शन, श्रीराम प्रासदिक भजनी मंडळ, श्रावस्ती नाट्य संस्था कलापथकांच्या माध्यमातून अंबरनाथ तहसिल कार्यालय, हाजीमंगल वाडी, नेवाली, करावे, वजेश्वरी, गणेशपूरी, आकलोली, शिरगांव, पडघा, सापे, मुरबाड बस स्थानक, म्हसा, नारीवली, धसई खेवारे या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *