लातूर प्रतिनिधी दि. २७ – लावणी, दशावतार, खडी गंमत, झाडी पट्टी या महाराष्ट्राच्या विविध भागात त्या त्या काळी लोकांच्या मनोरंजनासाठी जन्मलेल्या कला आहेत. त्या राज्याच्या सांस्कृतिक लोकधारा आहेत. त्या राज्यात विविध भागात गेल्या पाहिजेत. लातूर सारख्या कलेच्या क्षेत्रात लौकिक असलेल्या नगरीत असे महोत्सव इथल्या स्थानिक कलाकारांना मोठे प्रोत्साहन देणारे ठरतात. या उद्देशाने राज्य सांस्कृतिक संचालनालयाने कोविड नंतर पहिला महोत्सव लातूर मध्ये आयोजित केल्याचे सांगून आज २६ मार्च ते २८ मार्च दरम्यान या लावणी महोत्सवाचा लातूर जिल्ह्यातील लोकांनी आनंद घ्यावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
लातूर मार्केट यार्ड परिसरातील स्व. दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘लावणी महोत्सव २०२२’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललित शहा, उपसभापती मनोज पाटील, श्रीशैल उटगे, किरण जाधव उपस्थित होते.
आज पर्यंत राज्यात सोलापूर वगैरे भागात असे लावणी महोत्सव झाले आहेत. पहिल्यांदा लातूर मध्ये लावणी महोत्सव होतो आहे याचा आपल्याला आनंद असून हा जिल्हा कलेची जोपासना करणारा असून या जिल्ह्याचे सुपुत्र कलावंत ज्यांनी पहिला चित्रपट काढला, ज्याचे निर्माते, दिग्दर्शक होते ते श्रीराम गोजमगुंडे त्यांच्या चित्रपटाचे नाव होते, ” झटपट करु दे खटपट ” आणि हा चित्रपट राज्यात करमुक्त व्हावा म्हणून सभागृहात विषय मांडला होता तो विलासराव देशमुख साहेबांनी अशी हृद आठवण सांगून हा जिल्हा कलेची जान असलेला आहे. रितेश देशमुख हे आज मराठी, हिंदी, इंग्रजी मध्ये काम करत आहेत. या शहरात आज पर्यंत शांघाय, जमीर, वाय असे चित्रपट तयार झाले आहेत. इथली माती कलेची जोपासना करते तसेच चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणते त्यामुळेच असे महोत्सव या शहरात व्हायला हवेत म्हणून मुद्दाम आपण हा महोत्सव लातूर मध्ये आयोजित केल्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
लोक कलाकरांना आधार
कोरोना काळात लोक कला सादर करणाऱ्या कलाकरांचे सादरीकरण बंद पडले. त्यामुळे आर्थिक संकट त्यांच्यावर आले याची जाणीव ठेवून सरकारने राज्यातील या कलाकारांना चाळीस कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केलं.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कलेची जाणीव असलेले असल्यामुळे यापुढेही कला आणि कलाकारांसाठी उत्तम देत राहू हे सांस्कृतिक मंत्र्यांनी सांगितले.
लावणी महोत्सव -२०२२ साठी लातूर नगरीत आलेल्या ‘ सविता जळगावकर आणि पार्टी, पुणे, न्यू अंबिका कलाकेंद्र आणि पार्टी, चौफुला, पद्मावती कलाकेंद्र आणि पार्टी, मोडनिंब, शीतल नागपूरकर आणि पार्टी चौफुला, आशा रूपा परभणीकर आणि पार्टी मोडनिंब, उषा रेश्मा नर्लेकर आणि पार्टी, पुणे, नूतन कलाकेंद्र आणि पार्टी, इस्लामपूर, नीता काजल वडगावकर आणि पार्टी, सनसवाडी, पुणे, संगीता प्रमिला लोदगेकर आणि पार्टी मोडनिंब या सर्वांचे लातूर नगरीत स्वागत असल्याचे सांगून प्रेक्षकांनी २६ ते २८ मार्च हे तीन दिवस या लोक कलेचा आनंद घ्यावा असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
कोविड संपल्यानंतर लातूर मध्ये या पूर्वी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा झाल्या, आणि आता पहिल्यांदा राज्यस्तरीय लावणी महोत्सव होत असल्याबद्दल लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आनंद व्यक्त केला. लोककला, जपली पाहिजे वाढली पाहिजे यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे उत्तम काम करत असल्याचे सांगून ओटीटी प्लँटफॉर्म आलेले असताना सुद्धा लोक कलेची गोडी लोकं विसरले नाहीत. हा प्रत्यक्ष कला पाहण्याचा आनंद मोठा असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले.
न्यू आंबिका कलाकेंद्र यांच्या गणेश वंदनेनी लावणी महोत्सवाला सुरुवात झाली. सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते.. अनेक प्रेक्षक उभं राहून लावणी कलेचा आनंद घेत होते. उत्तरोत्तर वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्या सादर करून प्रेक्षकांना आनंद दिला.
आजच्या गर्दीमुळे सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी लावणी महोत्सवात उद्या आणि परवा जे पहिले येतील त्यांना प्रवेश मिळेल असे सांगितले आहे.