वेश्या व्यवसायातील महिलांच्या पाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी आधार व समन्वय आवश्यक

मुंबई, दि. २९  : वेश्या व्यवसायातील महिलांच्या‍ पाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी व त्यांचे वेश्या व्यवसायातील प्रवेश रोखण्याकरिता समाजातील सर्व घटकांकडून त्यांना आधार व मार्गदर्शन करण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती तसेच राष्‍ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष उदय ललित यांनी केले.

सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती तसेच राष्‍ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष उदय ललित, महाराष्‍ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष तथा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे मा. न्‍यायमूर्ती श्री.ए.ए. सईद, उच्‍च न्‍यायालय विधी सेवा समितीचे अध्‍यक्ष तथा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे मा. न्‍यायमूर्ती श्री.एस.एस. शिंदे, श्रीमती अमिता ललीत यांनी मुंबई जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. हितेंद्र वाणी यांच्यासह अलीकडेच मुंबईमधील खेतवाडी परिसरातील प्रेरणा संस्‍थेला भेट दिली, त्याप्रसंगी मा.न्‍यायमूर्ती श्री. ललित बोलत होते.

मुंबईच्‍या देह व्‍यापार चालत असलेल्‍या विभागात प्रेरणा संस्‍थेतर्फे केल्‍या जाणाऱ्या कामकाजाबाबत संस्‍थेच्‍या प्रि‍ती पाटकर यांनी माहिती दिली.

याप्रसंगी सर्व सन्‍माननीय न्‍यायमूर्ती यांनी प्रेरणा संस्‍थेच्‍या रात्र काळजी केंद्रात शिकणाऱ्या मुलांशी तसेच देह व्‍यापाराशी संबंधित काही पीडित महिलांशीही चर्चा केली व त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. तसेच त्‍यांनी तेथील मुलांद्वारे राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमांचीही माहिती घेतली. सन्‍मानपूर्वक जीवनाकरिता शिक्षण हेच महत्त्‍वाचे असल्‍याचे याप्रसंगी प्रेरणा संस्‍थेच्‍या आधाराने आपले शिक्षण यशस्‍वीरित्‍या पूर्ण करणाऱ्या मुलांनी नमूद केले.

हेतू ट्रस्‍टचे सचिव श्री.रिखब जैन यांनी याप्रसंगी सदर संस्‍थेला व्‍हीडिओ प्रोजेक्‍टर भेट दिला. तुरूंग सुधारणेबाबत कार्य करणाऱ्या श्रीमती बिना चिंथलपूरी व आशियाना फाउंडेशनच्‍या श्रीमती साचि मणियार या सुद्धा याप्रसंगी हजर होत्‍या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *