मालेगावात एकात्मता जॉगिंक ट्रॅकचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न
मालेगाव, दिनांक ०३ : नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी या अत्याधुनिक एकात्मता जॉगिंग ट्रॅकची उभारणी करण्यात आली आहे. या अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅकमुळे मालेगावच्या वैभवात नक्कीच भर पडली असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
पोलीस कवायत मैदान येथील एकात्मता जॉगिंग ट्रॅकचा उद्घाटन व लोकर्पण सोहळा कृषिमंत्री दादाजी भुसे व आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, एकलहरा वीज प्रकल्पाचे उप अभियंता महेश तुंगार, ज्येष्ठ नागरिक डॉ. बबन गांगुर्डे, महिला प्रतिनिधी भावना निकम, कुस्तीपटू करण ठोके, श्रध्दा पवार, पिस्टल शुटर रुद्राक्ष खैरनार तसेच या कार्यक्रमासाठी उपमहापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे आवर्जुन उपस्थित होते. तसेच शहरातील नागरिक व क्रिडाप्रेमीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मालेगावकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकात्मता जॉगिंग ट्रॅक हे एक महत्वाचे पाऊल आहे. या जाँगिंग ट्रॅकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था आणि इतर सुविधा मालेगावकरांना उपलब्ध होणार आहेत. तसेच मालेगावकरांना अभिमान वाटेल अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मालेगावच्या विकासात येणाऱ्या काळात भर पडणार असल्याचेही श्री. भुसे यावेळी म्हणाले.
पुढे बोलतांना कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले की, या जॉगिंग ट्रॅकच्या माध्यमातून विविध खेळाडूंच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने कामे करण्यात येवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील,असेही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, माझ्या खडतर कष्टाच्या व सरावाच्या बळावर आज मी आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून नावारुपास आली आहे. त्याप्रमाणे इतर खळाडूंनीही प्रयत्न करुन आपल्या देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच मालेगावमध्ये अद्यावत असे क्रिडा संकुल बांधण्यात यावे जेणेकरुन तालुक्यातील विविध खेळात पारंगत असलेल्या गरीब व होतकरु खेळाडूंना त्याचा निश्चितच लाभ होऊन मालेगावमधील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करतील. तसेच नाशिक धर्तीवर मालेगावमध्ये सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात यावा, अशी मागणीही यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.