पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली कुस्ती आखाड्यांची पहाणी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२१ -२२ साताऱ्यात

सातारा दि. ०५ :  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येथील श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात उद्यापासून होणार आहे. या संकुलात कुस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या आखाड्यांची पाहणी सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

या प्रसंगी आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, साताऱ्यात पहिल्यांदा १९६३  साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात होत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली नाही. कोरोना संसर्ग कमी झाल्याने ही कुस्ती स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेचे चांगले नियोजन केले असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उद्यापासून उत्साहात सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सुरक्षेलाही महत्व देण्यात आले आहे. पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येकाची तपासणी करुनच स्पर्धा पाहण्यासाठी सोडण्यात येणार आहे. कुस्ती स्पर्धेसाठी शासनाकडून अनुदान मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *