बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर’ श्रेणीतील पुरस्काराबद्दल मुख्य सचिवांकडून एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन
मुंबई, दि. ८ – नागरी उड्डयन मंत्रालय, भारत सरकार (एमओसीए) आणि फिक्कीद्वारे आयोजित विंग्स इंडिया २०२२ इव्हेंट आणि अवार्डस् समारंभात महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनीला (एमएडीसी) अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट नागरी उड्डयन पद्धती, नवीनतम कल आणि नवकल्पना प्रदर्शित करणे आणि आदान – प्रदान करणे या उद्देशाने दिनांक २४ ते २७ मार्च २०२२ या कालावधीत बेगमपेट विमानतळ, हैदराबाद येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी) ने विंग्स इंडिया २०२२ इव्हेंट आणि विंग्स इंडिया अवॉर्ड्समध्ये “भागीदार राज्य” (पार्टनर स्टेट) म्हणून महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व केले. एमएडीसीने महोत्सवाच्या ठिकाणी अतिशय प्रशस्त, नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विमान वाहतूक क्षेत्रातील ठळक वैशिष्ट्ये, एमएडीसी, मिहान प्रकल्प, मिहानमधील प्रमुख विमान वाहतूक प्रकल्प आणि मिहानमधील कंपन्यांची माहिती प्रदर्शित करत विमान वाहतूक क्षेत्रातील राज्याच्या लक्षणीय कामगिरीचे प्रदर्शन केले. मान्यवर आणि व्यावसायिक ग्राहकांना हाताळण्यासाठी आणि बिझनेस टू बिझनेस मीटिंग आयोजित करण्यासाठी एअरसाइडवर आणखी एक सुंदर दालन उभारण्यात आले होते.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते, प्रामुख्याने शिर्डी आणि नागपूर विमानतळांसाठी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड यांना “बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर” या श्रेणीतील पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.
राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी या पुरस्काराबद्दल एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन केले असून एमएडीसी भविष्यातही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.