सोलापूर,दि.१३ : पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरूषोत्तम पाटोदकर हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. अडचणी, समस्यांच्या सोडवणुकीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
डॉ. पाटोदकर यांनी पत्रकार अधिस्वीकृती, जाहिरात धोरण, दैनिके आणि साप्ताहिकांच्या पडताळणीबाबत पत्रकारांच्या अडचणी जाणून घेतल्या. अंकाची पडताळणी ही जिल्हा माहिती अधिकारी करणार असून त्याचा अहवाल उपसंचालक कार्यालयाला पाठविणार आहेत. त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे आढळल्यास उपसंचालक कार्यालयामार्फत पडताळणी केली जाईल, असेही त्यांनी सूचित केले. पडताळणीबाबत प्रत्येक दैनिक, साप्ताहिकाच्या मालक, संपादक यांना पूर्व कल्पना दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिका, नगरपालिका जाहिरात देण्याबाबत साखळी पद्धतीचा अवलंब करीत नसल्याच्या तक्रारी पत्रकारांनी मांडल्या, याचेही निरसन डॉ. पाटोदकर यांनी केले.
यावेळी पत्रकारांच्या वतीने दैनिक अग्रणी वार्ताचे संपादक योगेश तुरेराव यांनी उपसंचालक डॉ. पाटोदकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, साप्ताहिक बंजारा दर्पणचे राजकुमार पवार, साप्ताहिक चोख उत्तरचे संपादक वामन निंबाळकर, साप्ताहिक सूर्यनारायणचे संपादक औदुंबर ढावरे, साप्ताहिक श्रीसंकेतचे संपादक महादेव जंबगी, साप्ताहिक सिध्देश्वर संदेशचे संपादक रमाकांत साळुंखे, पाक्षिक हिस्टोरी सोलापूरचे संपादक रामू गायकवाड, सचिन जाधव आदींसह पत्रकार उपस्थित होते.