भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कृतज्ञतापूर्वक अभिवादन

बाबासाहेबांच्या मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचवून देशातील एकता, समता, बंधूतेचा विचार मजबूत करुया… – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई, दि. १४  :- “भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका आणि संघटीत व्हा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचं, देशाची सार्वभौमता अखंडित ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झालं. नागरिकांना एका मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानानं जगण्याची, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार हे कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे. डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा विकास करणं, हेच डॉ. बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं, स्मृतींचं स्मरण करुन त्यांना वंदन केलं आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांसारखे महामानव आपल्या देशात जन्मले आणि त्यांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली हे आपलं भाग्य आहे. डॉ. बाबासाहेब हे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्वं बहुआयामी होतं. बाबासाहेब कायदेतज्ञ होते. घटनातज्ञ होते. अर्थतज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार सुद्धा होतं. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. डॉ. बाबासाहेबांनी केलेला, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचं आंदोलन, शेतकरी हक्कांच्या चळवळीसारखे दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका, हे लढे देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. बाबासाहेब कृतीशील विचारवंत होते. ध्येयासाठी, विचारांसाठी लढण्याची ताकद त्यांनी समाजाला दिली. बाबासाहेबांच्या विचारातंच देशाचं, अखिल मानवजातीचं कल्याण आहे. डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचतील, त्यातून देशाची राज्यघटना, एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असं आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना जयंतीनिमित्त वंदन केलं असून सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *