‘लाईफ लेसन’ पुस्तकाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते प्रकाशन

जिल्हाधिकारी आर. विमला यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

नागपूर दि. १८ : आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी या सोबतच काही महत्त्वपूर्ण नियम अंगी बाळगणे आवश्यक असते. यश अशा नियोजित वाटचालीला मिळत असते. असा संदेश देणाऱ्या आर. जी. राजन यांच्या ‘लाइफ लेसन’ या पुस्तकाचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते आज रविवारी प्रकाशन झाले.

प्रेस क्लब येथील सभागृहात आज झालेल्या एका शानदार प्रकाशन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे प्रकाशन पार पडले. या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आर. विमला, इंग्रजी साहित्याचे अभ्यासक हीस्लॉप कॉलेजमधील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. सुपंथा भट्टाचार्य, जिल्हाधिकारी आर. विमला यांचे वडील पी.जी. राजन तसेच लेखक आर.जी. राजन उपस्थित होते.

लेखक आर.जी. राजन हे केमिकल इंजिनिअर असून त्यांनी राष्ट्रीय केमिकल अॅन्ड फर्टीलायझर, प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड या राष्ट्रीय कंपन्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांचे ते बंधू आहेत.

या प्रकाशन सोहळ्याच्या व्यासपीठावरून बोलताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राजन यांच्या पुस्तकांमध्ये नव्या पिढीला आपला वारसा पुढे चालविण्याचे आवाहन असल्याचे स्पष्ट केले. बदलत्या, धकाधकीच्या काळामध्ये मानवापुढे सध्या वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली आहेत. मनुष्यबळ व्यवस्थापनापासून तर कार्यालयीन ताणतणावात स्वतःला अद्यावत ठेवण्याचे ठेवणे आवश्यक आहे. अशावेळी स्वतःला शांत ठेवून अपेक्षित यश मिळवणे यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांना परिश्रमपूर्वक स्वतःमध्ये निर्माण करणे, याची शिकवण या पुस्तकात मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे पुस्तक अन्य भाषांमध्ये देखील काढण्याची सूचना त्यांनी केली. या पुस्तकावर बोलण्यासाठी उपस्थित झालेले इंग्रजी साहित्याचे अभ्यासक, हीस्लॉप कॉलेजमधील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. सुपंथा भट्टाचार्य यांनी आर.जी. राजन यांचे पुस्तक आपल्या आयुष्यात व नोकरी कामांमध्ये येणाऱ्या नेहमीच्या संकटांना कसे सोडवावे, त्यातून बाहेर कसे पडावे यासाठी मार्गदर्शक असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी आर.जी. राजन यांनी लेखकाचे मनोगत व्यक्त केले. गेल्या चार वर्षाच्या परिश्रम पूर्वक संशोधनानंतर, चिंतनानंतर हा साहित्य अविष्कार जनते पुढे सादर करीत असल्याचा आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. आपल्या बंधूच्या पुस्तकाचे प्रकाशन देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी नागपूरला होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

या कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीष गांधी,  महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त आयुक्त माधवी खोडे,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, आयआयएमचे संचालक डॉ. भीमरया मेटी, वेस्टर्न कोल्ड फिल्डचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार प्रदिप मैत्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग प्रमुख, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *