नागपूर, दि. २४ : सावनेर तालुक्यातील जलालखेडा गावाचा डोंगराळ भाग शेती उत्पन्नाच्या दृष्टीने सोयीस्कर नसल्याने कुठलेही उत्पन्न त्याठिकाणी घेता येत नव्हते. आजच्या काळात सौर ऊर्जेचे महत्व वाढलेले असून सद्यस्थितीत या भागात सौर उर्जा पार्कची निर्मिती करण्यात आल्याने या परिसरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर सौरउर्जा प्रकल्प निर्मितीमुळे हा परिसर समृध्द झाला असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.
ॲटलांटिक ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने निर्मित १०० मेगावॅट सौर पार्कचे उद्घाटन श्री.केदार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्हेरियंट एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासन, चितराग खडका, विजयकुमार, पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे, उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पराते, पंचायत समिती सदस्य गोविंदराव ठाकरे, जलालखेडाचे सरपंच गुणवंत काळे तसेच विद्युत विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण अर्थव्यस्था मजबूत करण्यासाठी युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी आपण नेहमी प्रयत्नरत आहोत. या प्रकल्पामुळे निश्चितच स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत, असेही श्री. केदार म्हणाले. या प्रकल्पासोबतच या भागात उद्योजकांना आमंत्रित करुन उद्योगाचे जाळे निर्माण करावयाचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होण्यास मदत होवून स्थानिकांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सहकार्याची भूमिका ठेवावी. तरच विकास शक्य असल्याचे ते म्हणाले. १०० मेगावॅट प्रकल्पाचे रुपांतर 500 मेगावॅटमध्ये लवकरच करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांनी त्यांच्या गावात असलेल्या सौर उर्जेचे उपकरण हाताळण्याचे व्यवस्थापन करावे, याबाबत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती करुन घ्यावी. या परिक्षेत्रातील सर्व तलावातील गाळ काढून शेतात टाकण्याचा उपक्रम यावर्षी राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून वाढत्या खतांच्या किमतीमुळे हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीणअर्थव्यवस्था उंचावण्यासाठी राज्यातील कष्टकरी समाजाला १००० कोटी शेळयाचे वाटप करण्यात येणार आहे. या महाप्रकल्पामुळे राज्यात सावनेरचे नाव नेहमी स्मरणात राहील, असा मानस त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी श्री. केदार यांनी फित कापून व शिलालेखाचे अनावरण करुन सौरउर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी सौर उर्जा प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.