लोकशाही अधिक सक्षक्त करण्यासाठी लेखकांने त्रयस्थपणे व्यक्त व्हायला हवं

लातूर प्रतिनिधी, दि. २४ :- भारतरत्न लता मंगेशकर साहित्य नगरी लोकशाही मूल्ये शेवटच्या माणसाला समजण्यासाठी पर्यावरण, शेती, बेरोजगारी, वंचितांचे प्रश्न या लोकांच्या मुलभूत प्रश्नावर लिहिते व्हा, असा सूर “लेखक आणि लोकशाही मूल्ये” या परिसंवादात उमटला.

९५  व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक आणि लोकशाही मूल्ये या परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. निवडणूक आयोगाचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या सहभागात आयोजित परिसंवादात पर्यावरण लेखक अतुल देऊळगावकर, लेखक दिलीप चव्हाण, लेखक दिग्दर्शक राजकुमार तांगडे, लेखिका सोनाली नवांगुळ, आदिवासी भाषा अभ्यासक हेमांगी जोशी, पत्रकार हलिमा खुरेशी यांनी ठोस मते मांडली. डॉ. दिपक पवार यांनी या परिसंवादाची सूत्रे सांभाळली.

फक्त निवडणूक म्हणजे लोकशाही नाही, निवडणूक हा एक लोकशाहीतला भाग आहे. ही लोकशाहीची मूल्ये अधिक बळकट झाली पाहिजे म्हणून आम्ही “लोकशाहीवर गप्पा” हा कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

आरोग्य व शिक्षणासारखे सर्वसामान्यांना मिळणारे लाभ हा त्यांचा हक्क आहे, त्या हक्कावर अतिक्रमण होता कामा नये, त्यासाठी लेखणीच्या माध्यमातून लेखकांनी आवाज उठवावा असे आवाहन आदिवासी अभ्यासक हेमांगी जोशी यांनी केले. लोकशाही मूल्ये टिकवायची असतील तर समतेतून आलेले मोठेपण टिकवले पाहिजे. ते टिकविण्यासाठी लिहते हात अधिक मोकळे होण्याची गरज पत्रकार हलिमा कुरेशी यांनी व्यक्त केली.

लोकशाही अधिक सक्षक्त करतांना प्रत्येकांच्या हिताला प्राधान्य देवून इथल्या व्यवस्थेत दिव्यांगांपासून ते वंचितापर्यंतच्या न्याय हक्काची जपणूक झाली पाहिजे असे प्रतिपादन लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले. तर लेखकांनी आपल्या साहित्यातून मन तोडणारे नव्हे तर जोडणारे लेखन केले पाहिजे तरच समतेच्या हक्काची जोपासना होईल असे शिवाजी द अंडरग्राउंड इन भीम नगर मोहल्ला या नाटकाचे नाटककार राजकुमार तांगडे म्हणाले.

पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी पर्यावरण समस्या ही सर्वसामान्यांना अजूनही कळत नाही हे अगदी सोदाहरण सांगितले.

लेखक दिलीप चव्हाण यांनी लोकशाहीचे महत्त्व विशद करतांना, आपण रचनात्मक कामांपासून दूर तर जात नाही ना याची काळजी व्यक्त करत लेखकांनी रचनात्मक लिहिले पाहिजे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *