नांदेड प्रतिनिधी , दि. २६ :- हजारो रसिकांच्या उपस्थित १४ व १५ मे रोजी होणाऱ्या नरेंद्र-देवेंद्र महोत्सवात देण्यात येणाऱ्या सुधाकर पत्रभूषण वर्ष
२०२१ पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार कालिदास जहागीरदार यांची निवड करण्यात आली असून यापूर्वी जाहीर करण्यात आलेले
वर्ष २०१८ ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे ,वर्ष २०१ ९ आवृत्ती संपादक अनिल कसबे, वर्ष २०२० ज्येष्ठ पत्रकार सुनील जोशी यांनासुद्धा गौरविण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर व संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी
कै .सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ५ हजार , स्मृतीचिन्ह , सन्मानपत्र आणि राजवस्त्र असे आहे . यापूर्वी प्राचार्य देवदत्त तुंगार , गोवर्धन बियाणी , विजय जोशी यांना सुधाकर पत्रभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .
काही अपरिहार्य कारणास्तव नरेंद्र- देवेंद्र महोत्सव कार्यक्रम होवू न शकल्यामुळे चार वर्षाचे सुधाकर पत्रभूषण पुरस्कार यावर्षी देण्यात येणार आहेत .खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजप जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र- देवेंद्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. देशातील नामवंत कवींना व हास्य कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. नांदेडचा हा कार्यक्रम अभूतपूर्व होणार असल्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात जीवाची पर्वा न करता अनेक प्रश्नांना वाचा फोडणा-या चार शिलेदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर व भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.