नाशिक शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून विकास साधावा; स्काय लाईनची मर्यादा पाळावी

नाशिकदिनांक २६ नाशिक महानगरपालिकेने शहराचा सर्वांगीण विकास करतांना शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून विकास करावा. महापालिकेचे दायित्व दुपटीवर गेल्यामुळे आवश्यकता असलेलीच कामे करावी, शहरातील उड्डाणपुल व इतर विकास कामे  आवश्यकतेनुसार करावी,जेणेकरुन नाशिकची स्काय लाईन खराब होता कामा नये. तसेच महापालिकेतील मंजूर असलेली अत्यावश्यक पदांची भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राजीव गांधी भवन येथे आयोजित महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे,करुणा डहाळे, उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे पाटील, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, गोदावरी संवर्धनचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपायुक्त (कर) अर्चना

तांबे, डॉ. दिलीप मेनकर,मुख्य लेखापरीक्षक किरण सोनकांबळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे व  इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महानगरपालिकेच्या अत्यावश्यक ६९५  पदांना मंजूरी आली आहे. सदरची पदे वैद्यकीय, पाणीपुरवठा व अग्नीशमन विभागाची असून मंजूरी

मिळालेल्या पदांची लवकरात लवकर भरती प्रक्रीया राबविण्यात यावी. त्यांनी महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिकेवर 2800 कोटींचे दायित्व असल्याने आवश्यकतेनुसार कामे करण्यात यावी, असे पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक शहरात विविध महत्वाकांक्षी प्रकल्प राबवितांना ते सुटसुटीत असावे. मुंबईतील शिवाजी मैदान जेवढे महत्वाचे तेवढेच अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) आहे. त्या मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे मोठे समारंभ घेण्यासाठी मैदान मोकळे राहण्यासाठी अनावश्यक बांधकाम टाळावे. तसेच नाशिक शहरात सर्वाधिक जॉगिंग ट्रॅक आहे. मात्र खेळासाठी व मोठ्या सोहळ्यासाठी शहरात जागा सापडत नाही. त्यादृष्टीने मैदान विकसित करण्यात यावे.

महानगरपालिकेकडून दिव्यांगासाठी इटीसी सेंटर सुरु  केले जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण व सेवा आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच शहरातील रस्त्यांची कामे दर्जात्मक करावी.रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रार आल्यास गुणवत्ता विभागाकडून तपासणी करावी, निकृष्ट कामे करणारांची गय करू नये. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

कुंभममेळाकाळात नाशिक शहरात व शहराबाहेर रिंग रोडची कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्याने प्रस्तावित केलेल्या बाह्य रिंगरोडचा अभ्यास करून मगच विकसित करण्यात यावे.फक्त भूसंपादन डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प करू नये. शहरातील वाहतूक बेटांचा आकर्षक नाविन्यपूर्ण पद्धतीने सीएसआरच्या माध्यमातून  विकसित करण्यास प्राधान्य देवून शहरात जाहिरातीसाठी आवश्यक स्पॉट विकसित करण्यात यावेत.म्हणजे महापालिकेला उत्पन्न सुध्दा मिळेल.

नमामि गोदा प्रकल्प अंतर्गत गोदावरी, चार उपनद्या व ६७  नाले प्रदूषण मुक्त करण्याबरोबर गोदावरी व इतर नद्यांचे सोंदर्यीकरण करावे. गोदावरी व नंदिनी नदीला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यास प्राधान्य देण्यात यावे. तसेच शहराच्या पाणी पुरवठा व सांडपाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, जेणेकरुन दूषित पाणी नदीत जाणार याची काळजी घ्यावी, असेही श्री. पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. तसेच अमृत २ योजनेअंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

इतर ठिकाणी बिओटीवर विकसित करण्यात आलेल्या भूखंडाचा अभ्यास करूनच नाशिक येथील मिळकती विकसित करण्यास प्राधान्य द्यावे. या भुखंडावर शाळा, महाविद्यालय, रुग्णालय व समाजउपयोगी कामांना प्राधान्य देण्यात यावे.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहरातील काही स्थळांचा विकास महानगरपालिकेने स्वत: करावा. फाळके स्मारक बीओटी वर न देता ते महापालिकेने विकसित करावे, स्मारकाचा विकास करतांना काही सल्लागाराच्या कल्पना मागवून त्यांच्या कडून आर्कषक रचना करावी. फाळके स्मारक विकसित करतांना चित्रनगरीच्या धर्तीवर काही कल्पक करण्याचा विचार करावा.म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य त्याचा लाभ होईल. तसेच सिंहस्थ कुंभमेळात सात ठिकाणी सुंटर घाटांची निर्मिती करण्यात आली आहे.  या सर्व घाटांची नियमित देखभाल करण्यात यावी. कन्नमवार ते लक्ष्मीनारायण पुलाच्या दरम्यानचा घाट आणि तेथील मोकळ मैदानाचा वार चौपादी, प्रदर्शन, सभा, समारंभ,फेस्टीवल, कला, क्रिडा व इतर कार्यक्रमासाठी केल्यास शहराचे सौंदर्य अबाधित राहीत व पर्यटनात वाढ होवून महानगरपालिकेला शाश्वत उत्पन्न मिळेल.

शहरात आयटी पार्क विकसित करण्यासाठी विपुल जागा व त्यानुंषगिक सपोरटीव्ह इन्फ्रास्ट्रक्चर इ.बाबी या सगळ्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयटीपार्क विकसित करतांना विचारपूर्वक निर्णय घेण्यात यावा. तसेच प्रगती मैदानाच्या धर्तीवर  साधुग्रामच्या जागेवर पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. मोकळी मैदाने, रुग्णालय, शिक्षण संस्था, ज्येष्ठ नागरिक संघाची सभागृह, अभ्यासिका केंद्रांची आवाजवी भाडे वाढ थांबवावी. तसेच कोरोना निर्बंध कमी झालेले आहे मात्र अद्यापही शहरातील काही गार्डन बंद आहेत.महानगरपालिकेचे उद्याने व सार्वजनिक ठिकाणे तात्काळ सुरु करण्यात यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

सेंट्रल पार्क इत्यादी जी कामे १००  टक्के पूर्ण झालेली आहे अशा कामांचे उद्घाटन करून हे प्रकल्प लोकांसाठी खुले करून द्यावी, प्रकल्प बंद राहिली तर त्यांची वाताहत होत असते असे मंत्री भुजबळ म्हणाले. नाशिक महापालिकेच्या हद्दीतील जुन्या गावठाणांचा पुर्नविकास करण्यात यावा. तसेच नाशिक शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हेरिटेज समिती स्थापन करण्यात यावी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी भुखंड देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. सिटी लिंक बस सेवेचा प्रवाशांचा अनुभव  चांगला असून शंभर टक्के क्षमतेने बसेस सुरु करण्यात याव्या, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी महानगरपालिकेत गेल्या २  वर्षापासून झालेले नियमबाह्य भूसंपादन, स्मार्ट सिटी,मलनिस्सारण प्रकल्पांचे अपग्रेडेशन, बिटको हॉस्पिटल मधील सुविधा, महापुरुषांची स्मारके, शहर स्वच्छता,  महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनातील फरक व इतर कामकाजाचा आढावा घेतला.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपाआपल्या विभागाच्या कामकाजाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *