देगलूर प्रतिनिधी दि २७ :- देगलूर व बिलोली तालुक्यातील वाळू घाटातून नियमांना धाब्यावर बसवून वाळू उपसा केला जात होता. अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा जनतेकडून विविध स्वरूपात तक्रार करूनही या लुळ्या पांगळ्या प्रशासनावर कसलाच फरक पडत नव्हता. आभाळाला टेकेल एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनातून वाळूची वाहतूक केली जात होती. शिवाय वाळू घाटातून जेसीबी व पोकलेन च्या सहाय्याने बेसुमार वाळू उपसा केला जात होता.
दरम्यान प्रशासनाच्या हलगर्जीपणाला लगाम म्हणून पत्रकार तथा माहिती अधिकार तपास समितीचे तालुकाध्यक्ष इर्शाद पटेल व पत्रकार हबीब रहेमान यांनी प्रशासनाला नियमाने काम करण्याचे निवेदन दिले होते. नियमांच्या अंतर्गत कार्य होत नसल्याने संबंधित महसूल,पोलीस व आरटीओ या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यासंदर्भात थेट औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे तक्रार देऊन दिनांक. २५/०४/२०२२ रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मात्र उपोषणकर्त्यांनी थेट वरिष्ठांशी संपर्क साधताच प्रशासन खडबडून जागे झाले. आणि कार्यवाही म्हणून तब्बल ८ अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्या पकडून त्यांच्यावरती कार्यवाही केली. तब्बल ८ गाड्या पकडल्या गेल्याची बातमी पसरताच वाळू माफियांचे धाबे दणाणले असून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळू वाहतूक नियमांचा फज्जा उडवणाऱ्या वाळू माफियांना मोठी चपराक लगावली असल्याची चर्चा सबंध देगलूर तालूक्यात होत आहे. कार्यवाही पूर्ण करून नवनियुक्त सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा (IAS) व कार्तिकेयन (IAS) यांनी उपोषण करते इरशाद पटेल व हबीब रहेमान यांना उपोषणापासून परावृत्त व्हावे. अशी विनंती केली कार्यवाही पूर्ण झाल्याचे पाहून विनंतीस मान देऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले व देगलूर तालुक्यातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले. केवळ उपोषणाचे हे फलित असल्याने सबंध देगलूर शहरातून उपोषणकर्ते इर्शाद पटेल व हबीब रहेमान यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या.