शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहाेचवण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

गडचिरोली, दि. २७: माडिया हा महोत्सव पारंपारिक उत्सव न राहता माहिती देणारा प्रसंग व्हावा. राज्य शासनाच्या लोकपयोगी योजनांची माहिती सहभागी होणाऱ्यांना मिळावी. मुख्य प्रवाहात आणणारा हा सोहळा ठरावा, अशा शुभेाच्छा नागपूर विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे यांनी आज येथे दिल्या.

भामरागड माडिया महोत्सवाची सुरुवात झाली असून २८ मे पर्यंत विविध स्पर्धांच्या आयोजनातून त्याची सांगता होणार आहे. उद्घाटन प्रसंगी पद्मश्री विजेते फोटोग्राफर सुधारक ओलवे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित, अतिरीक्त पोलीस अधीक्षक अनुज तरे, उपवनसंरक्षक आशिष पांडे, भामरागड प्रकल्पस्तरीय विकास समितीचे अध्यक्ष नामदेव उसेंडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, तहसीलदार अनमोल कांबळे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी पारंपारिक पद्धतीने तीर, कामठे व रेकी देऊन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी भाषणात विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी उपस्थितांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना व त्या योजना मिळवण्याची प्रक्रिया सोप्या भाषेत सांगितली. यावेळी त्या म्हणाल्या, कला आणि क्रीडा यामध्ये भेद नसतो यातून आदिवासी बांधवांचे कौशल्य समोर येते. येथील दुर्गम भागातील युवकांना येत्या काळात क्रीडा क्षेत्रात उतरण्यासाठी निश्चितच प्रशासनाकडून बदल केले जातील. त्या पद्धतीने सोयीसुविधाही उपलब्ध होतील. मी या भागात तिसऱ्यांदा आली आहे, पूर्वीचा भामरागड आणि आताचा भामरागड यात खूप फरक पडला आहे. आता या ठिकाणी सहज येता येते. येथील लोकांशी संवादही सहज साधता येतो. शासनाच्या अनुसूचित जमातींमधील लोकांसाठी प्राधान्य असणाऱ्या खूप योजना आहेत. प्रशासकीय यंत्रणांनी व लोकांनी एकत्र येऊन काम केल्यास निश्चितच त्या योजना घरोघरी जातील. गावस्तरावर ग्रामसभांमध्ये योजनांचे वाचनही होणे आवश्यक असल्याचे मत विभागीय आयुक्तांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भामरागड आणि परिसरातील प्रथा, परंपरा, संस्कृतीबाबत प्रशंशा केली. ते म्हणाले या ठिकाणचे राहणीमान असेल येथील लोकांची वागणूक असेल याचा बोध गैरआदिवासी भागातील लोकांनी घेण्यासारखा आहे. प्रशासन अनेक अडीअडचणींना झुगारून गावोगावी जाऊन लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचे यशस्वी काम करत आहे. यामध्ये अजून गती देणे गरजेचे असून प्रत्येक घरातील आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासन अखंडपणे काम सुरू ठेवेल.

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आदिवासी संस्कृती, आदिवासी भाषा जपण्याचे आवाहन उपस्थितांना केले. दुर्गम भागातील विकास गतीने होण्यासाठी आम्ही यापूर्वी भामरागड तालुका स्वतंत्र केला. पूर्वीपेक्षा येथील चित्र आता बदलले आहे. जाण्या-येण्यासाठी चांगले रस्ते निर्माण झाले आहेत. येत्या काळात दुर्गम भागातील रस्तेही पूर्ण करून विकास कामे केली जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आमदार डॉ.देवराव होळी यांनी आपल्या भाषणात माडिया गोंडी भाषा जतन करण्याची गरज असल्याचे सांगून ही भाषा टिकली तर पुढच्या काळातील पिढीकडे संस्कृतीचे वहन होईल असे मत व्यक्त केले. भामरागड स्तरीय प्रकल्प विकास समितीचे अध्यक्ष नामदेव उसेंडी यांनी आदिवासी समाज हा मानवी मूल्य जपणारा समाज असल्याचे मत व्यक्त केले. महिला पुरुष समानता या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही सगळी वैशिष्ट्ये या समाजाची ताकद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांनी केले.

माडीया महोत्सवाचे आकर्षण

तीन दिवसीय माडिया महोत्सवामध्ये लोकनृत्य, रेला, पारंपारिक वेशभूषा, हस्तकला, पारंपारिक खाद्यपदार्थ इत्यादी स्पर्धा तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, नौकानयन, तिरंदाजी, गुलेल यासारख्या क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कार्यक्रम ठिकाणी बचत गटांचे विविध स्टॉल, साहित्य विक्री केंद्र, विविध योजनांची माहिती केंद्र लावण्यात आली आहेत. त्या ठिकाणी वनोपजापासून तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ येणाऱ्या पर्यटक तसेच नागरिकांसाठी विक्रीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत. परिसरात दुर्गम भागातील छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. महोत्सवामध्ये २५०० स्पर्धक, ३०० व्यवस्थापनासाठी असलेले अधिकारी कर्मचारी तसेच स्टॉल साठी आलेले दोनशेहून अधिक व्यावसायिक आहेत. तसेच पहिल्याच दिवशी हाजारो वेगवेगळ्या ठिकाणाहून नागरिकांनी भामरागड येथे भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *