मुंबई, दि. ५ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (मिफ्फ २०२२) सांगता समारंभ तसेच पुरस्कार प्रदान सोहळा नेहरू केंद्र मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, पीआयबीचे महानिदेशक मनीष देसाई व मिफ्फचे संचालक रविंदर भाकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विभागातील सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन फिल्म, सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट माहितीपट हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यपालांच्या हस्ते डच माहितीपट ‘टर्न युअर बॉडी टू द सन’ ला गोल्डन कोंच पुरस्कार देण्यात आला तर साक्षात्कारम (मल्याळम) व ‘ब्रदर टोल’ या लघुपटांना सिल्व्हर कोंच पुरस्कार विभागून देण्यात आला. ‘प्रिन्स इन अ पेस्ट्री शॉप’ या पोलिश ऍनिमेशन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अनिमेशन फिल्म पुरस्कार देण्यात आला. पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन इरझिक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राष्ट्रीय प्रवर्गातील पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले.