कन्नड भवनच्या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडो

सोलापूर, दि. ७: वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाचा वापर सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसाठी येणाऱ्या जगतगुरू महाराजांच्या निवासासाठी होणार आहे. या भवनातून केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना चांगली अभ्यासिका करावी. या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

कुंभार वेस येथील जयभवानी मैदानात वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य, श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, माजी महापौर महेश कोठे, धर्मराज काडादी, संतोष पवार, आनंद चंदनशिवे, सुधीर खरटमल आदींसह लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, कन्नड भवनाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम व्हावेत. भवनाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. जिल्हा नियोजन समितीतून एक कोटींचा निधी दिला जाईल. जनतेच्या पैशाचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर निधीची कमतरता नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

गेल्या दोन वर्षात कोरोना संकट होते, याचा मुकाबला आपण केला. कोरोना काळात खाजगी दवाखान्यांनी ओपीडी बंद केली होती, डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांना ओपीडी सुरू करण्यास सांगितले. कोरोना काळात सुरूवातीला भीती होती, कोणी कोरोना रूग्णाजवळ जात नव्हते. मात्र पालकमंत्री सिव्हील हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात जावून रूग्णांची विचारपूस केली. स्वच्छता, अन्न, पाणी यांची योग्य सोय असल्याची खात्री केली असल्याचे श्री. भरणे यांनी सांगितले.

दीड वर्षांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार

सोलापूर शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी चार-चार दिवस वाट पाहावी लागत आहे, हे दुर्देव आहे. येत्या दीड वर्षात समांतर पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यामुळे सोलापूरकरांना रोज पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा बसवेश्वर महाराजांचेही स्मारक

मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक नियोजित आहे. यासाठी ४५ एकर जागा मंजूर झाली असून महात्मा बसवेश्वर महाराजांचे चांगल्या प्रकारचे स्मारक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही श्री. भरणे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. कोठे यांनी सांगितले की, कन्नड भवनाचा वापर लिंगायत समाजातील मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी केला जाईल. मुलांच्या राहण्याची, अभ्यासाची सोय येथे होणार आहे. बहुउद्देशीय सभागृह म्हणून कन्नड भवनचा उपयोग होणार आहे.

सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *