केंद्राच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत वाशिम जिल्ह्याचा गौरव

मुंबई, दि. ११  : केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा 2020-21’ मध्ये वाशिम जिल्ह्याला उल्लेखनीय कार्यासाठी दिल्ली येथे ‘उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आल्याने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाचे, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अभिनंदन केले आहे. वाशिम जिल्हा कौशल्य नियोजन आराखड्यात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या पुढच्या काळात वाशिम जिल्हा अव्वल दर्जाची कामगिरी करेल, असा विश्वासही पालकमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

वाशिम हा आकांक्षित जिल्हा आहे. जिल्ह्याचा मुख्य घटक शेती आहे. जिल्ह्यातून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ जात असल्याने बांधकाम क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. केंद्रशासनाच्या ‘संकल्प’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांसाठी बेकरी, पाककला आणि शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री म्हणून वेळोवेळी आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्याचा झालेला सन्मान जिल्हा प्रशासनाला प्रोत्साहन देणारा आहे, असे पालकमंत्री श्री.देसाई यावेळी म्हणाले. केंद्रीयस्तरावर सन्मान झालेल्या सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाचेही यावेळी त्यांनी अभिनंदन केले.

दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात  मंत्रालयाचे सचिव  राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’ (२०२०-२१) पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्ह्यांतून निवडल्या गेलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी  दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *