देगलूर प्रतिनिधी, दि.१५ :- तेवीस दिवसात दिल्लीहून देगलूर पर्यंत सायकलवर प्रवास करत पुढे जाताना व्यक्ती दिसला सायकलवर अडकवलेली एक बॅग, अर्धा लिटर चे २ छोटेसे कॅन लटकलेल्या, थकलेला चेहरा त्याला पाहताच कुतूहल वाटून चौकशी केली असता त्याने दिल्लीचे असल्याचे सांगितले व व्यापारी असल्याचे सांगितले.
या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की दिल्ली येथील उत्तम नगर येथे वास्तव्यास असलेले तंबाखू व्यापारी अनिल भारद्वाज वय ५१ वर्ष हरिद्वार ते रामेश्वर ३६०० किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत आहेत. ते दररोज ८० ते १०० किलो मीटर सायकलचा प्रवास करतात व संध्याकाळी मंदिरात किंवा इतर ठिकाणी मुक्काम करून परत सकाळी पुढचा प्रवास करतात. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी बरीच वर्ष सायकल देखील चालवलेली नव्हती असे ते सांगतात. हरिद्वार येथून गंगाजल घेऊन ते २३ मे रोजी निघून तेथून महाकाल उज्जैन, ओमकारेश्वर, मल्लिकार्जुन, ते रामेश्वर अशी यात्रा करून गंगाजल रामेश्वर येथील महादेवावर अर्पण करणार आहेत.
या यात्रेस त्यांनी ‘धन्यवाद यात्रा’ असे नाव दिले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ईश्वराच्या कृपेने मला न मागता इतके दिले आहे कितीही पैसा खर्च करून त्यांचे ऋण मी फेडू शकत नाही त्यामुळे महादेवाला प्रिय असलेले गंगाजल मी हरिद्वार येथून घेऊन सायकलने प्रवास करून त्यांना अर्पण करीत आहे.