२६ जून रोजी राज्यभर साजरा होणार सामाजिक न्याय दिन
नांदेड प्रतिनिधी, दि. २४ :- बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या राजसत्तेच्या माध्यमातून प्रयत्नरत असलेले व स्वत:च्या आचरणातून सामाजिक न्यायाचा संदेश समाजात रूजविणारे थोर लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती येत्या २६ जून रोजी शासनातर्फे साजरी केली जात आहे. त्यांची ही जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाणार असून सामाजिक न्यायाच्या त्यांनी दिलेल्या योगदानाला या दिनाच्या माध्यमातून अधोरेखित केले जात आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना सन २००५-२००६ मध्ये करण्यात आली होती. सदर समितीने संशोधन करून पुराभिलेख संचालनालयाला अहवाल सादर केला होता. या समितीच्या अहवालानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्म तारीख संशोधनाअंती २६ जून १८७४ अशी घोषित केली आहे. हा दिन अर्थात त्यांची जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचा शासना निर्णय घेतला.