नांदेड दि.२८ :- जिल्हयात सध्या खरीप हंगाम पेरणीचे कामे सुरु आहेत. शेतकरी खते बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत चाचपणी करीत आहेत. जर रासायनिक खत खरेदी सोबत घाऊक खत विक्रेते शेतकऱ्यांना तसेच किरकोळ विक्रेत्यांना इतर निविष्ठांची सक्ती करीत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तात्काळ तक्रार नोंदवावी. तसेच जिल्हा तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक ९६७३ ०३३ ०८५ (व्हॉटसप क्रमांक) व ०२४६२ -२८४२५२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
बाजारपेठेत आज स्थितीत जिल्हयात किरकोळ कृषि सेवा केंद्र धारकाकडे खालील प्रमाणे खत साठा उपलब्ध आहे. युरीया १८३६० मे.टन, डीएपी २४८१ मे.टन, एमओपी १६७६ मे.टन, संयुक्त खते १४४११ मे.टन, एसएसपी ८६३४ मे.टन असे एकूण ४५ हजार ५६२ मे. टन साठा खत साठा शिल्लक उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी गरजेनुसार व कृषि विद्यापिठ यांच्या शिफारस मात्रेनुसार पिकांना लागणाऱ्या खतांची खरेदी करावी. एकात्मिक अन्न व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट खतांचा संतुलीत वापर करावा. विद्यापिठाने शिफारस मात्रेनुसार खत नियोजन करते वेळेस कमी खर्चात खतांचे नियोजन होईल याची काळजी घ्यावी. एकाच कोणत्याही खताची आग्रह न धरता उपलब्ध खतापासुन पिकास शिफारस मात्रेप्रमाणे खताचा वापर करावा असेही आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.