औरंगाबाद प्रतिनिधी, दि.०१ :- बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथे केली.
कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची ही कामगिरी उल्लेखनीय व अभिनंदनीय बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने संकेत सरगरला ३० लाख रुपये तर त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक जाहीर करुन संकेतची कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.