‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमातून स्वातंत्र्यवीरांचे स्मरण…!

भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये बलिदान दिलेल्या तसेच मोलाचे योगदान दिलेल्या ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारकांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, त्या माध्यमातून स्वातंत्र्याचा इतिहासाची उजळणी व्हावी या उद्देशाने ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’अंतर्गत देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गतच देशभरात येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

 

 

देशातील प्रत्येक नागकांमध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. जागतिक स्तरावर देशाला विकासाकडे नेत असतानाच युवा पीढीला आपल्या इतिहासाशी जोडून ठेवण्याचे महत्वपूर्ण काम या उपक्रमातून होणार आहे. ‘जो समाज इतिहास विसरतो , तो समाज इतिहास कधीच घडवू शकत नाही’ असे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास सदैव जागृत ठेवायचा आहे. यातूनच आपल्याला जीवनात नवा इतिहास घडवण्याची प्रेरणा मिळणार आहे.

 

 

जगातील सर्वात मोठी युवाशक्ती भारतामध्ये आहे असे विविध अहवालांचे दाखले देऊन सांगितले जाते. असे असताना या युवाशक्तीचा विधायक कामांद्वारे देशाच्या विकासात हातभार लावण्याचे आव्हान पेलायचे असेल तर आपल्या दिव्य स्वातंत्र्यलढ्याचा, देशभक्तीचा इतिहास जागवणे आणि राष्ट्रभक्तीची भावना मनामनात रुजवणे आवश्यक आहे.

 

 

सुमारे एकवीस लाख घरांवर फडकणार तिरंगा

राज्य शासनाच्या बरोबरीनेच पुणे जिल्हा प्रशासनाने ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. प्रशासनातर्फे स्वातंत्र्य सैनिकांप्रति सन्मानाची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक आणि वारसास्थळांवर रोषणाई करण्यात आली आहे. नागरिकांनी या स्थळांना भेटी द्याव्यात आणि इतिहास जाणून घ्यावा असे प्रयत्न आहेत.

 

 

जिल्ह्यात सुमारे २१ लाख ६० हजार कुटुंबे असून या प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात तिरंगा ध्वजाची उपलब्धता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात, महानगरपालिकांच्या प्रत्येक प्रभागात, स्वस्त धान्य दुकानांमधून स्वस्त दराने तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनीही ध्वजविक्री केंद्रे सुरू केली आहेत.

 

 

जनजागृतीसाठी वातावरण निर्मिती

जिल्ह्याताल तालुका मुख्यालयी प्रभात फेरी काढण्यात येऊन स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. भर पावसात विविध तालुक्यातील नागरिकांनी यात सहभाग घेत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला वंदन केले.

 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा संकल्प अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.विद्यापीठ तसेच महाविद्यालये, माध्यमिक, प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्रता रॅली, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गीत स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आदींद्वारे ज्ञात स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यलढ्यातील अनाम वीरांचे स्मरण केले जात आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

 

 

जिल्ह्यात एसटी बसेसवर ‘हर घर झेंडा’ आणि ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ बाबत माहितीचे, आवाहनाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. एसटी स्थानके, मेट्रो स्थानकांवर प्रवाशांच्या माहितीसाठी होणाऱ्या उद्घोषणा यंत्रणेवरुनही जिंगल्स, हर घर तिरंगा बाबतची गीते प्रसारित केली जात आहेत.

 

 

स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोशाद्वारे स्वातंत्र्यसैनिकांची माहिती

राज्य शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश खंड-तीन चे २०१६ मध्ये प्रतिरुप पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ज्ञात स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारक यांच्या कार्याची संक्षिप्त माहिती यामध्ये आहे.

 

आज आपणाला अज्ञात आहेत अशा स्वातंत्र्यचळवळीत तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारक तसेच भूमिगत राहून क्रांतीकार्य केलेल्या क्रांतीकारकांबाबतही माहिती यामध्ये आहे. याशिवायही अनेक स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारक यांची माहिती उपलब्ध नसल्याने यामध्ये समावेश होऊ शकला नसेल. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या औचित्याने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात नागरिकांना विनामूल्य वाचनासाठी हा चरित्रकोश उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

 

घरोघरी तिरंगा मोहिमेमध्ये शासनाचे सर्व विभाग सहभागी झाले असून कामगारविभागाच्यावतीने सर्व दुकाने, आस्थापनांमध्ये तिरंगा ध्वज लावण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. त्याशिवाय परिवहन विभागाने सर्व वाहतूक संघटनांनाही आपाल्या सभासदांना प्रेरित करण्‍याबाबत आवाहन केले आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरीचिंचवड महानगरपालिका तसेच विविध नगरपालिकांकडूनही श्रमदानाचा सहभाग घेऊन राष्ट्रीय पुरूषांच्या पुतळे, स्मारक स्थळै, सार्वजनिक जागांची स्वच्छता आदी विविध उपक्रम सुरू आहेत.

 

 

जिल्ह्यातील प्रत्येक घरावर आपला तिरंगा ध्वज डौलाने फडकवावा. ध्वज फडकवताना ध्वजसंहितेचे पालन करावे आणि राष्ट्रध्वजाचा मान आणि प्रतिष्ठा जपावी. स्वातंत्र्य लढ्यातील अनामविरांचे कार्य जाणून घ्यावे, त्याविषयी आदराची भावना व्यक्ती करावी. सर्वांच्या सहभागाने हा उत्सव स्मरणीय होण्यासोबत सर्वांच्या मनात देशाभिमानाची भावना सतत तेवत ठेवणारा ठरेल.

 

-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *