नांदेड प्रतिनिधी, दि. ०३ :- अंगणवाडी सेविका विविध आव्हानांवर मात करत केवळ शासकीय सेवा म्हणून नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणूनही तेवढ्याच जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडीत असतात.
तुमचे योगदान व हे काम करतांना येणाऱ्या अडचणी मी जाणून असून अंगणवाडी दुरूस्ती पासून ते इतर सेवा-सुविधा कसा उपलब्ध करता येतील याबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी तरोडा बु. येथे आयोजित राष्ट्रीय पोषण माह २०२२या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिवीक्षा अधिकारी खानापुरकर, परिविक्षा अधिकारी जिंदमवार, राष्ट्रमाता विद्यालयाचे संचालक अवधुत क्षीरसागर, मुख्याध्यापक नरवाडे, श्री. शहाणे, श्री. सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
पोषण माहमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून यात पोषण रॅली, ॲनिमिया कॅम्प, महिला व किशोरींना मार्गदर्शन करणे, स्वस्थ बालक-बालिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा शिसोदे यांनी केले तर सुत्रसंचलन मुख्यसेविका वैशाली मेघमाळे यांनी केले. शेवटी आभार रेखा पडोळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्यसेविका अर्चना शेटे, शकुंतला पेंद्र, प्रतिभा खिराडे, सुनंदा ढाकरे, सेविका व मदतनिस यांनी परिश्रम घेतले.