राष्ट्रीय पोषण माहनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन पोषण अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. ०४  : महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी समाजामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पोषण आदीबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील १ ते ३० सप्टेंबर, २०२२ या कालावधीत केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या पूर्व शालेय शिक्षण, आहार विषयक जनजागृती, स्वस्थ बालक स्पर्धा या संकल्पनावर आधारित राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येणार आहे.

 

 

 

            त्यादृष्टीने गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायतीला पोषणमाह मधील उपक्रमांचा मुख्य आधार / कणा बनवून जनआंदोलनात लोकसहभागात रुपांतर करणे तसेच ग्रामपंचायती व ग्रामपंचायतीच्या विविध स्थायी समित्यांच्या माध्यमातून पोषणासाठी लोकसहभाग ही संकल्पना साकार होण्याच्या दृष्टीने कार्य करणे अपेक्षित आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण माह अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका, संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत विविध उपक्रम व बालक बालिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

त्या अनुषंगाने माहे सप्टेंबर २०२२ हा महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा करण्यासाठी केंद्र शासनाने कळविल्यानुसार दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर, २०२२ या कालावधीत पोषण रॅली, गणेशोत्सव देखाव्यामध्ये बॅनर लावणे, पोषण वाटिका तयार करणे, स्क्रिनिंग राबविणे, घरोघरी योग-कुटुंबासोबत योग अभियान, गरोदर स्त्रियांची ॲनिमिया तपासणी, पूरक पोषण आहाराबाबत माहितीपटाच्या माध्यमातून जनजागृती करणे, गरोदर स्तनदा, ६ वर्षाखालील बालकांसाठी व किशोरी मुलींसाठी ॲनिमिया चेक अप कॅम्प आयोजित करणे, आहाराबाबत समुपदेशन व प्रात्यक्षिके आयोजित करणे, पाणी व स्वच्छतेच्या अभावाने होणारे आजार याबाबत मार्गदर्शन, कुपोषण रोखण्यासाठी विविध शिबिराचे आयोजन, हात धुणे व वैयक्तीक स्वच्छता, पोष्टिक आहार पाककृती प्रदर्शन, जिवनशैली बदलांच्या अनुषंगाने आजारापासून बचावाबाबत मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीसंदर्भात मार्गदर्शन, गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी स्तनपान संदर्भात मार्गदर्शन शिबीर,शाळा आधारित कार्यक्रमाचे आयोजन, स्वस्थ बालक स्पर्धा , मुलींच्या जन्माचे स्वागत , महिला बचत गटाची सभा, गृहभेटी, लसीकरण आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

 

 

 

 

राष्ट्रीय पोषण अभियान अधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी, अंगणवाडी ताई, मदतनीस आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *