मराठवाडा मुक्ती गाथा (भाग -३ )

रुई – रामेश्वरला पेशवे – निजाम भेटी मागची कथा..!!

              दिल्लीचे मुघल साम्राज्य औरंगजेबाच्या मृत्यूनंतर फारसे प्रभावी राहिले नाही.  शाहू महाराज १७०८  ला मराठी साम्राज्याचे छत्रपती झाले आणि मराठ्यांचा प्रभाव वाढता झाला. दिल्ली सलतनतवरही मराठ्यांचा दबाव वाढला, त्यातूनच 1718 ला मुघल आणि मराठ्यात करार झाला.. त्यातून हैद्राबाद कडून चौथाई महसूल मराठ्यांना देण्याचे कबूल करण्यात आले. दिल्लीच्या कमकुवत   तख्त फायदा घेत हैद्राबाद संस्थान कारभार बघणाऱ्या निजाम उल मुल्कने दिल्लीत आपले वजन वाढविले आणि गुजरात पर्यंत आपले पाय पसरले… तो एवढ्यावर थांबला नाही दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्याची तयारी करून त्यासाठी मराठ्यांबरोबर दोस्ती करून १७२४  ला साखरखेर्डायाच्या लढाईत मराठ्यांच्या सहकार्याने दिल्लीच्या सलतनतचा पराभव केला. आपण मागच्या लेखात बघितले निजामाने १७१८  चा कराराचा सन्मान न राखता चौथाई देण्यास नकार दिला.. त्यातून मराठ्यांनी छोट्या मोठ्या चढाया केल्या. त्यातूनही निजाम शरण येत नाही हे बघून

                २८ फेब्रुवारी १७२८ रोजी पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य व हैदराबादचा निझाम यांच्यातील पालखेडच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. महाराष्ट्रातील नाशिक शहराजवळ असलेल्या पालखेड येथील लढाई होती. पराभव झालेल्या निझामाने मुंगी-पैठण या गावात ६ मार्च  १७२८ रोजी तह स्वीकारला. त्या तहात छत्रपती शाहू महाराज मराठी साम्राज्याचे छत्रपती आहेत हे निजामाने मान्य केले. पुढे मराठी साम्राज्य विस्तार होत गेला… पुढे माळवा युद्ध झाले.मराठ्यांनी गुजरात ताब्यात घेतला पण निजामाच्या खोड्या अजूनही थांबायला तयार नव्हत्या. त्यातून अधून मधून छूप्या पद्दतीने त्रास देणे सुरूच होते..

वारणा तह

                   १७३१  मध्ये विशाळगडावर कोल्हापूर गादीचा आणि साताऱ्याच्या गादीत तह झाला. दोन्ही गाद्याचे भांडण मिटले. मग छत्रपती शाहू महाराजांच्या सैन्याने खोडी लावणाऱ्या निजामाचा बंदोबस्त करण्याचा चंग बांधला त्यातूनच  २७ डिसेंबर १७३२ रोजी लातूर जवळच्या मांजरा नदीच्या काठी असलेल्या रुई – रामेश्वर येथे निजाम उल मुल्कने मराठेशाही विरुद्ध कट रचल्याबद्दल बाजीराव पेशवे, चिम्माजी आप्पा यांच्या समोर माफी मागितली. नंतर मात्र निजामाने मराठ्याची खोडी काढल्याचे नमूद नाही.

क्रमशः

 

           @ युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *