उपमुख्यमंत्री यांच्याकडून लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वराज्याला सुराज्यात परावर्तीत करण्यासाठी दृढसंकल्प होऊया

मुंबई, दि. ०१ :- इंग्रज सरकारविरोधातल्या भारतीय असंतोषाचे जनक, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महान नेते लोकमान्य टिळक यांच्या १०१ व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले असून लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वराज्याला, सुराज्यात परावर्तीत करण्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली. कृतज्ञता व्यक्त केली.

लोकमान्य टिळक यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारविरोधात देशवासियांना एकजूट करण्याचं, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरीत करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. स्वराज्य हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, हा विचार त्यांनी दिला. भारतीय स्वातंत्रलढ्याची आग धगधगती राहील याची काळजी घेतली. त्यासाठी लोकचळवळ उभारली. कठोर तुरुंगवास भोगला. लोकमान्य टिळकांचं नेतृत्वं आणि कोट्यवधी भारतवासियांच्या त्यागातून, संघर्षातून, बलिदानातून देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखणं, भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेची मूल्ये समाजात खोलवर रुजवणं हीच, लोकमान्य टिळकांना खरी आदरांजली ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *