ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील भरीव योगदान

मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष दि. १७ सप्टेंबर, २०२२ पासून वर्षभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांची मुलाखत घेतली असता त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत स्वत:ला झोकून देत सहभाग नोंदविला असल्याचे सांगितले. 

श्री. माणिकराव मारोतराव देशमुख टाकळगव्हाणकर यांनी १९४२ च्या इंग्रजांविरुद्धच्या चलेजाव चळवळीपासून स्वातंत्र्यलढ्यास  सुरुवात  केली. १९४७ मध्ये भारतास स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर निजामाविरुद्धच्या लढ्यात उडी मारली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात लढ्यास सुरुवात केली.

भारतीय सैन्याने निजामाविरुध्द सुरु केलेल्या पोलीस ॲक्शनमध्ये कनेरगाव नाका, बळसोंड, माळहिवरा व हिंगोली येथील कारवाईत सैन्यास निजामाच्या हालचाली, रणनितीबद्दल जिवाची पर्वा न करता माहिती पुरविली. त्यामुळे भारतीय सैन्याला निजामाचा पाडाव करण्यास यश मिळाले. शेंबाळपिंपरी येथे असलेल्या कॅम्पचे नेतृत्व करणारे दिपाजी पाटील दातीकर यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ येथील बॉम्ब स्फोटामध्ये सहभाग नोंदवत माणिकराव टाकळगव्हाणकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात भरीव योगदान दिले असल्याचे सांगितले.

 

 

 

सशस्त्र लढा उभारला १९४८ मध्ये हैदराबाद संस्थांनास स्वातंत्र्य मिळाले याकामी सहकारी कै. अण्णाराव टाकळगव्हाणकर, कै. दिपाजी पाटील, कै. मोहनराव धामणेकर, कै. नानासाहेब दळवी यासह दोनशे इतर सहकारी माझ्यासोबत होते. देशाला स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याचे रुपांतर सुराज्यात व्हावे असे स्वप्न उराशी बाळगून हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी अनन्वित अत्याचार सहन केले. एकट्या मराठवाड्यात 245 स्वातंत्र्यसैनिक हुतात्मे झाले. अंगात बळ असो वा नसो स्वातंत्र्याची ऊर्मी अंगी असल्यामुळे अनेकांनी  धगधगत्या स्वातंत्र्याच्या होमकुंडात जीवाची पर्वा न करता उडी  घेतली . त्याला रुपये पैशात मोजता येणार नाही. स्वातंत्र्याच्या प्रेरणेने धुंद झालेल्या लोकशक्तीचा तो एक महान आविष्कार होता. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात जी राष्ट्रीय मूल्य जनतेत रुजवली गेली. बलिदानातून व हजारो लोकांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळवले या लढ्याचा मी साक्षीदार असल्याचे श्री. माणिकराव देशमुख यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले.

 दरवर्षी ०९ ऑगस्ट ला भारत सरकारच्या वतीने मा.राष्ट्रपतींच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात येतो. महाराष्ट्रातून दरवर्षी पाच जण दिल्ली येथे जातात या सत्कार समारंभासाठी माझी २०१५ साली निवड झाली होती. हा सत्कार सोहळा राष्ट्रपती भवन येथील अशोका हॉल येथे संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम माननीय राष्ट्रपती महोदय, त्यानंतर माननीय उपराष्ट्रपती महोदय आणि माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते ०९ ऑगस्ट, २०१५ रोजी माझा सत्कार करण्यात आला, अशी माहितीही श्री. माणिकराव टाकळगव्हाणकर यांनी दिली.

 

 

 

 

स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. ९ ऑगस्ट, २०१५ रोजी राष्ट्रपती भवन येथे मा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मा.पंतप्रधानाच्या हस्ते आणि सन २०१० मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. तसेच राजकारणात सक्रीय होऊन १९६७ ते ७२ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य, १९७६ ते १९९० राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते वयाची ९७ वर्षे पूर्ण करत असून ते अजूनही समाज कार्यात मग्न आहेत.

 

 चंद्रकांत कारभारी                                                                                           माहिती सहायक

 जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *