महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवाकर विभागाची कारवाई
मुंबई प्रतिनिधी, दि २४ :- अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ८८.८४ कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करुन घेऊन व त्याद्वारे जीएसटी कर रुपातील महसूल बुडविल्याप्रकरणी मे. सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्स / सनराइज मिल मेल / सनराइज केमिकल्सचे मालक हिरेन पारेख यांना राज्य वस्तू व सेवाकर विभाग, पुणे यांनी अटक केली आहे.
में, सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्स / सनराइज मिल मेल / सनराइज केमिकल्स यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि केमिकल्सचा व्यवसाय असून त्यांनी अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवांच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय मिळविलेल्या खोट्या खरेदी देयकांद्वारे जीएसटी कर बुडविला आहे, असे विभागाच्या लक्षात आले.
याबाबत आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संपूर्ण कारवाई राज्यकर सहआयुक्त पुणे दीपक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली व राज्यकर उपायुक्त सुधीर चेके यांच्या देखरेखीखाली तसेच अपर राज्यकर आयुक्त, पुणे धनंजय आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवाकर विभागाने आजपर्यंत या अटकेसह ४३ विविध प्रकरणात अटक केल्या आहेत.