देगलूर प्रतिनिधी, दि.२५ :- अलीकडच्या काळात व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाला खूप महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्याला स्वतःचा रोजगार निर्माण करता यावा व त्यास स्वावलंबी बनविणारे शिक्षण देणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या व एकमेव ‘ब’ दर्जाची एकमेव नगर परिषद असलेल्या देगलूर शहरात रोजगाराची संधी उपलब्ध होणारे अभ्यासक्रम सुरु करावेत अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गाची मोठ्या प्रमाणात होती. त्यास प्रतिसाद देवून अडत व्यापारी शिक्षण संस्थेने नांदेड विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून डी.टी.एल. (Diploma in Taxation Law ) हा पदव्युत्तर डिप्लोमा आणि एम.एस्सी भौतिकशास्त्र या दोन नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता प्राप्त केली आहे.
महाराष्ट्र , कर्नाटक व तेलंगाना या तीन राज्याच्या सीमावर्ती भागातील व ग्रामीण शेतकरी- शेतमजुरांच्या मुलामुलींना दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे म्हणून इ.स.१९६३ मध्ये अडत व्यापारी शिक्षण संस्थेची व देगलूर महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
या संस्थेने काळाची गरज ओळखून दरवर्षी नवनवीन अभ्यासक्रम सुरु करून देगलूर शहरातच दर्जेदार उच्च शिक्षण व संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डी.टी.एल हा अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्याला नांदेड अथवा लातूर येथे जावे लागत होते. हा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करणारे नांदेड जिल्ह्यातील तालुकस्तरावरील पहिले देगलूर महाविद्याय हे पहिले महाविद्यालय आहे.
बी.ए., बी.कॉम व बी.एस्सी. पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करून ‘कर सल्लागार ‘ म्हणून सेवा करता येते.
देगलू महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी. बरोबर एम.ए. (मराठी, हिंदी, इतिहास लोकप्रशासन, राज्यशास्त्र ), एम.एस्सी .रसायनशास्त्र , वनस्पतीशास्त्र व भौतिकशास्त्र आणि एम.कॉम या पदव्युत्तर शिक्षण दिले जाते.
इतकेच नव्हे तर लोकप्रशासन, मराठी, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र व वनस्पतीशास्त्र या विषयाचे मान्यता प्राप्त पीएच.डी. संशोधन केंद्र असून आजपर्यंत २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी पूर्ण केली आहे.
या नवीन अभ्यासक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी केले आहे.