जिल्ह्यात लम्पी प्रतिबंधक लसीकरण गतीने पूर्ण करावे

अमरावती दि. ०२ :-  राज्यात लम्पी रोग नियंत्रणासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून लम्पी प्रतिबंधक लसीकरण गतीने पूर्ण करण्यात यावे. अश्या सूचना पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

वरुड तालुक्यातील शेंदुरजना घाट येथील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या क्षेत्रात लम्पीबाधित परिसराची पाहणी श्री विखे-पाटील यांनी केली व पशुपालकांसोबत संवाद साधला.

खासदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा,  पशुसंवर्धन आयुक्तालय पुणेचे उपआयुक्त डॉ. प्रशांत भड, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय कावरे, सहायक आयुक्त डॉ. राजीव खेरडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके उपस्थित होते.

श्री विखे म्हणाले, बाधित क्षेत्रात ठिकठिकाणी प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी. लसीकरण पूर्ण करावे. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी गावपातळीवर लम्पीविषयी जनजागृती करावी. पशुपालकांनी भयभीत न होता आजाराची लक्षणे आढळल्यास बाधित जनावरांवर तात्काळ उपचार करावे, असे आवाहन श्री विखे यांनी यावेळी केले.   

महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू व लम्पी त्वचारोग उपचार व प्रतिबंधक अभियानाचे प्रमुख कर्नल डॉ. आशिष पातुरकर यांच्यासह चमूतील संस्थेचे संचालक, विस्तार शिक्षण प्रा.डॉ. अनिल भिकाने, अकोला पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे, पशु औषधशास्त्र डॉ. सुनील वाघमारे, डॉ. सारिपूत लांडगे यावेळी उपस्थित होते.

श्री.विखे यांनी दवाखान्यात उपलब्ध असलेल्या औषधसाठ्याची यावेळी माहिती घेतली. पशुपालकांशी संवाद साधुन लम्पी आजारामुळे निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेतली. बाधित जनावरांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *