लम्पी चर्मरोग आजाराने पशुधन दगावलेल्या पशुपालकांना अर्थसहाय्य वितरित

नागपूर,दि. ०८ :  सद्यपरिस्थितीत पशुधनावर लम्पी चर्मरोग आजार राज्यात सर्वत्र आढळून येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना या प्रादुर्भावातून दिलासा देण्यासाठी पशुधन दगावलेल्या पशुपालकांना अर्थसहाय्याचे वितरण उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले.  

 

यावेळी पारशिवनी तालुक्यातील सिहोरा येथील पशुपालक अशोक महादेव रोडेकर यांना मृत गाईच्या नुकसान भरपाईसाठी ३० हजार रुपयांचा धनादेश तर नरखेड तालुक्यातील खंडाळा येथील पशुपालक माधवराव मुंदाफळे व कुही तालुक्यातील सातारा येथील पशुपालक धुलीचंद कडव यांना मृत बैलाच्या नुकसानभरपाईसाठी प्रत्येकी २५ हजाराचा रुपयांचे धनादेश उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पशुपालकांना अर्थसहाय्याच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, सर्वश्री आमदार ना. गो. गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, सुनील केदार, समीर मेघे, राजू पारवे, मोहन मते, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, अॅड. आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर,  नियोजन उपायुक्त धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नरेंद्र पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *