देगलूर प्रतिनिधी,दि.०८:- लेंडी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी ४ ऑगस्टपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले ॲडव्होकेट इर्शाद पटेल यांचे आमरण उपोषण प्रशासनाने लेखी टाईम बॉण्ड दिल्यानंतर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले.
उपोषणादरम्यान बारा गावांच्या धरणग्रस्तांसह रावणगावच्या नवतरुणांचा, विविध पक्षांचा, सामाजिक संघटनांचा आणि पत्रकार संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला. उपोषणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली.
प्रशासनाशी पहिल्या दोन दिवसांच्या चर्चेत ठोस निकाल न लागल्याने इर्शाद पटेल आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. चौथ्या दिवशी तब्येत खालावल्यानंतर प्रशासनाने ३० ऑक्टोबरपर्यंत पुनर्वसनातील कामे पूर्ण करण्याची लेखी हमी दिली. तसेच मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कार्यवाही होईल असे स्पष्ट नमूद केले.
मुख्य मान्य झालेल्या मागण्या:
२१ वर्षे पूर्ण झालेल्यांना वाढीव कुटुंब मावेजा देण्याचा विचार
वारस मुलगी असल्यास मोबदला देण्याचा निर्णय
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र परत घेऊन एकमुश्त रक्कम देण्याबाबत चर्चा
वाहतूक भत्ता ५० हजारांपेक्षा जास्त देण्यास मान्यता
१५ ऑगस्टनंतर प्रमाणपत्र नसलेल्यांसाठी विशेष कॅम्प
काही मुद्दे वरिष्ठ पातळीवरील असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पुढील आठवड्यात विशेष बैठक होणार आहे.
“रावणगावच्या नवतरुणांपासून मीडिया, सामाजिक संघटना आणि मित्रपरिवार – सर्वांच्या पाठिंब्याने मी ही लढाई जिंकली,” असे समाधान व्यक्त करत पटेल यांनी उपोषण समाप्त केले.