सातारा दि. ०६ : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात परिवहन व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
या बैठकीला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक सागर पळसूदे आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाल्यामुळे काही गांवामध्ये एसटीची वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या इतर रुटवर एसटी सुरु आहेत. तसेच माल वाहतुकीतून महिन्याला दीड ते दोन लाखाचे उत्पन्न मिळत आहेत. ११ नवीन बसस्थानके बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे राज्य परिहवन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री. पळसुदे यांनी सांगितले.
उपप्रादेशिक परिहवनचा आढावा घेताना कार्यालयीन कामकाजासाठी वाहनांची आवश्यकता असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले. कार्यालयाला लागणारी वाहने ही जिल्हा वार्षिक योजनेतून घ्यावी. यासाठी पालकमंत्री महोदयांशी चर्चा करावी, अशा सूचना राज्यमंत्री श्री. पाटील यांनी केल्या.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. पाटील यांनी कार्यालयामार्फत माजी सैनिकांसाठी करत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.