आशीर्वाद देणारे उपक्रम राबवित आहे मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्र – कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. ०६ : ग्रामीण भागातून येणारे शेतकरी बांधव, वाहन धारक, वाहन चालक यांच्यासाठी  अल्पदरात घरगुती जेवण व शुध्द पाणी देवून मदतीचा हात व जिव्हाळा देणाऱ्या मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रामार्फत आशीर्वाद देणारे उपक्रम राबविले जात असल्याची भावना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केली.

तालुक्यातील मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रातील मुख्य प्रवेशव्दार, स्ट्रीट लाईट्स, बळीराजा शिवथाळी, पिण्याच्या शुध्द पाण्याचे आर.ओ.प्लॅनचा शुभारंभ कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. प्रसंगी सरपंच रंजना पिंपळे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, संजय दुसाणे, रामभाऊ मिस्तरी, वसंत कुवर, रामराव सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, अशोक देसले, राहूल पाटील, गोकुळ सुर्यवंशी यांच्यासह पंचक्रोषीतील शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

.

मुंगसे गावातील खरेदी-विक्री केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतांना याठिकाणी स्वतंत्र बँक शाखेची निकड लक्षात घेत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले. तर पुरग्रस्तांसाठी या केंद्रामार्फत मोफत कांदा उपलब्ध करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम या केंद्रामार्फत सुरु आहे. पंचक्रोषीतील शेतकरी बांधवांचा विश्वास संपादन करण्याबरोबर शेतकऱ्यांना सर्व मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून बाजार समिती अंतर्गत मुंगसे केंद्राने आज जे नावलौकीक मिळविले आहे अशा सर्व सदस्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या. शासनामार्फत आज शिवभोजन केंद्रातून राज्यातील सुमारे २५ लाख लाभार्थ्यांना मोफत भोजन दिले जात आहे. मात्र मुंगसे येथील केंद्रावर ना नफा, तोटा तत्वावर बळीराजासाठी शिवथाळीचा अत्यंत चांगला उपक्रम राबविला जात आहे. या शिवथाळीच्या उपक्रमासाठी १ लाखाची मदत देण्याची घोषणाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केली.

तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पुर्णत्वास नेणार

उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिके करपण्याच्या भितीने येथील शेतकरी चिंताग्रस्त असतांना दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पुरग्रस्त परिस्थितीचा सामना माझे शेतकरी बांधव करित आहे. निसर्गाचा हा लहरीपणा आपण अनुभवत असलो तरी या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून शेतकरी बांधवांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची माहिती देतांनाच, तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न लवकरच पुर्णत्वास नेणार असल्याचा विश्वास कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंगसे केंद्रामार्फत शेतकरी बांधवांना १ रुपयात १ लिटर शुध्द पाणी तसेच १० रुपयात पोटभर जेवण देण्यासाठी बाजार समिती कटिबध्द असल्याची माहिती प्रस्तावनेतून बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे यानी दिली. तर स्वच्छ व प्रतवारीचा माल पंचक्रोषीतील शेतकऱ्यांनी आणल्यास त्यांना नक्कीच चांगला भाव मिळेल अशी भावना व्यक्त करतांना बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव म्हणाले, केंद्रावर येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येत असून या केंद्राला उप बाजार समितीचा दर्जा मिळविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील असा विश्वासही श्री जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी राहूल पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त करुन केंद्राच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तर सचिव अशोक देसले यांनी उप‍स्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *