सातारा, दि. ५: अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या काही गावांमधील घरे मातीखाली गाडली गेली आहेत. त्या गावातील नागरिकांची तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निवारा शेडची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
अतिवृष्टी बाधित नागरिकांसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ज्यांचे भूस्खलनात संपूर्ण घर मातीखाली गेले आहे त्यांच्या तात्पुरते पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने करा, अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, तात्पुरत्या पुनर्वसनासाठी कुठे जागा भाड्याने मिळत असेल तर तीही घ्या. त्यांच्या कायमच्या पुनर्वसनासाठी जागेचा शोध घ्या. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, वाहून गेल्या व मलबा पडलेला आहे, अशा शेतजमिनी पूर्ववत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केल्या.