नागपूर प्रतिनिधी, दि.०८ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र दहा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आज दिली.
पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुसज्ज दहा रुग्णवाहिकाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, वित्त व शिक्षण सभापती भारती पाटील, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, समाकल्याण सभापती नेमावली माटे, यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, आरोग्य विभागाच्या जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी सुरेखा चौबे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आरोग्य सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सागताना श्री. केदार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 56 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात आणखी दहा रुग्णवाहिकेची भर पडली आहे.
नवीन रुग्णवाहिका जिल्हा विकास निधी तसेच खनिज विकास निधी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, कन्हान व नवेगाव खैरी (तालुका-पारशिवणी), प्राथमिक आरोग्य केंद्र, अडेगाव (तालुका-हिंगणा), प्राथमिक आरोग्य केंद्र, केळवद व वडेगाव (तालुका-सावनेर), प्राथमिक आरोग्य केंद्र, व्याहाड (तालुका-नागपूर), प्राथमिक आरोग्य केंद्र, गोंडखैरी (तालुका-कळमेश्वर), प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरधन व मनसर (तालुका-रामटेक) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, तारसा (तालुका-मौदा) अशा एकूण दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
पंचायत राज बळकट करण्यासाठी हिंगणा, कळमेश्वर, पारशिवनी, रामटेक, सावनेर, मौदा, आणि नागूपर या पंचायत समितीच्या सभापतींना श्री. केदार यांच्या हस्ते रुग्णवाहिका सूपूर्द करण्यात आली.
प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रश्मी बर्वे यांनी स्वागत करून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाल्यामुळे रुग्णांना तातडीच्या परिस्थितीत त्यांच्या गावात तसेच अतिशय गंभीर आजाराच्या रुग्णांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात भरती करणे सुलभ होणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे लसीकरण मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याने दहा लाखाचा पल्ला सुद्धा पूर्ण केला असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी रुग्णवाहिका यांच्या सुविधेबद्दल आभार मानले.