मुंबई प्रतिनिधी, दि. १० : आदिवासी समाजातील लोकपरंपरा, लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी लोकसंस्कृती व लोकपरंपरा या ऑनलाईन चर्चासत्राचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष श्री.झिरवाळ यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.
विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ म्हणाले, हा कार्यक्रम राज्यस्तरावर होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतिवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या स्मृती जागृत करणे तसेच या माध्यमातून तरुणांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश आहे. आदिवासी समाजाने शिक्षण क्षेत्रात पुढे आले पाहिजे. आदिवासी समाज हा जिद्दी आणि कष्टाळू आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांचे हक्क ,शिक्षणाची जोड मिळाल्यास हा समाज अधिक प्रगती करू शकेल. समाजातील सर्व लोकांनी लोककला आणि परंपरा जोपासण्याचे प्रयत्न करावा, असे आवाहन श्री.झिरवाळ यांनी यावेळी केले.
आदिवासी समाज निसर्गाला आपले दैवत मानतो. आदिवासी समाज हा जंगलाचा रहिवासी असून जंगलातून मिळणाऱ्या उपजावर आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे जंगल आणि आदिवासी समाज यांची नाळ जोडली गेली आहे. आदिवासींच्या सक्षमतेवर अधिक भर देण्याची गरज आहे. आदिवासी समाजातील अनेक कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले असल्याचे श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
या चर्चासत्रात डॅा. गणेश चंदनशिवे यांनी आदिवासींची सिद्धी धमाल याविषयी मनोगत व्यक्त केले. श्री. करवीरदास यांनी आदिवासी नायकांचे राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान, हेमराज उईके यांनी आदिवासी संस्कृती व भारतीय समाज, श्रीमती मोहेश्वरी गावीत यांनी आदिवासी महिलांचे सांस्कृतिक योगदान तर कैलास महाले यांनी आयुर्वेद व आदिवासी समाज या विषयावर माहिती दिली.