महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
नवी दिल्ली, दि. १० : स्त्रियांनी कविता आणि आत्मकथनपर साहित्य भक्कमपणे उभे केल्याचे मत, लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी मांडले.
‘महाराष्ट्रातील स्त्री साहित्याचा जागर’ या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ५३ वे पुष्प गुंफताना डॉ. पवार बोलत होत्या.
कविता आणि आत्मकथनपर लेखनाकडे महिला का वळतात त्याची समाजशास्त्रीय कारणे असल्याचे त्या म्हणाल्या. इतिहासाकडे, भूतकाळाकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टीकोण आहे, त्याचे कविता आणि आत्मकथनातून केलेले दस्तऐवजीकरण हे फार महत्त्वाचे आहे. जात, वर्ग यामध्ये गुंतलेले स्त्री जीवन, दुहेरी तिहेरी शोषणाचे आलेले अनुभव आत्मकथनातून दिसून येतात. भुकेची विक्राळता आत्मकथनातून कुटुंबातील, घराबाहेरील हिंसाचार या सगळ्यांचे चित्रण दलित आत्मकथनात स्त्रियांनी केल्याचे दिसते. यासोबतच महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून मिळालेले शिक्षण त्यातून आलेले स्वभान स्वत:चा समाजातील स्त्रिया आणि दलितोत्तर स्त्रियांचे जीवन निरीक्षण या महिला लिहित्या होत गेल्याचे डॉ. पवार यावेळी म्हणाल्या. यासह मुस्लिम, ख्रिस्ती, आदिवासी माहिला साहित्यिकांनी कुटुंबाची चौकट मोडून समष्टीपर्यंतचे लेखन या स्त्रिया करीत राहिल्याचे दिसते, असे डॉ. प्रज्ञा पवार म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, स्त्रियांनी निर्माण केलेला साहित्याचा कालातीत प्रचंड असा पट आहे. कलात्मक, वैचारिक, संशोधनात्मक, समीक्षात्मक, ललित आणि ललितेतर लेखनामध्ये महाराष्ट्रातील स्त्री साहित्यिकांचे प्रचंड मोठे
योगदान आहे. यावेळी त्यांनी आधुनिक स्त्री साहित्यिकांबरोबरच प्राचीन काळातील तसेच मध्ययुगीन काळातील स्त्री साहित्यिकांवरही प्रकाश टाकला. दळताना, कांडताना, घरातील काम करताना, पाणवठ्यावर असताना एकूणच घरातील आणि घराबाहेरची कामं करताना स्त्री गात होती, व्यक्त होत होती, संवाद साधत होती.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रसह भारतात स्त्री अभ्यास केंद्र सुरू झाल्याचे दिसते. यासोबतच १९७५ नंतर स्त्री मुक्तीची एक दमदार चळवळ उभी राहिल्याचे दिसते असा उल्लेख करून डॉ. पवार यांनी यावेळी केला. यामुळे स्त्रीच्या एकूणच कार्याला उलटून पाहण्याचा अभ्यास यामुळे करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
भारतातील खंडप्राय देशातील स्त्रियांचे जगणे हे जात, धर्म, वर्ण, वर्ग या चौकटीत जखडलेले आहे. त्यामुळे स्त्री साहित्याचा विचार करताना या उतरंडीचा विचार होणेही गरजेचे सांगून या सर्व सामाजिक परिस्थितीतूनही मानवी मूल्यांचा जागर माहिलांनी कसा मांडला हे पाहणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. महात्मा जोतिराव फुलेंचा उल्लेख करून त्यांनी सांगितले, भारतातील जातीय आणि धार्मिक विषमतेचं अचूक विश्लेषण फुले यांनी त्या काळात मांडले. पुढे हिंदू कोड बिलामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी मांडलेले विचार हे अधिक उन्नत स्वरूपाचे होते, त्याचा फार मोठा सकारात्मक परिणाम पुढील काळात महिलांवर झाला आणि विशेषत: महिलांनी लिहिलेल्या साहित्यावरदेखील झाला असल्याचे निरीक्षण डॉ. पवार यांनी नोंदविले.
त्या पुढे म्हणाल्या, १९ शतकाच्या सुरूवातीपासून स्त्री आत्मकथनाची सुरूवात झाली असल्याचे दिसून येते. हे आत्मकथन विद्रोही स्वरूपाचे होते. या आत्मकथनात स्त्रियांचे स्वभान दिसून येते. यावेळी त्यांनी काही आत्मकथनांचा उल्लेख केला यामध्ये काशीबाई कानेटकर यांचे‘माझे शिक्षण’, पार्वतीबाई आठवले यांची ‘माझी कहाणी ’, रमाबाई रानडे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘स्मृतीचित्र’ अशी वैशिष्ट्यपूर्ण आत्मचरित्र लिहिली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. नंतरच्या काळात दलित आत्मकथनांचा जन्म झाला आणि या आत्मकथनात भर पडत गेली असल्याचे डॉ. पवार म्हणाल्या. यामध्ये शिक्षण घेऊन जगण्यातील मूल्यात्मक झालेला बदल पाहता दलित आत्मचरित्र विशेष ठरतात.
एक काळी लेखन हे महिलांचे क्षेत्र नव्हतेच. त्यात पूर्णपणे पुरूषांची मक्तेदारी होती. त्यामुळे महिला जेव्हा लिहित्या झाल्या त्यावेळी त्यांनी वापरलेल्या रूपक, उपमा, शब्द हे नवीन होते. महिलांना विनोद करता येत नाही असे म्हटले जात असे, पंरतु स्मृतिचित्रापासून ते उर्मिला पवार यांच्या ‘आयदान’पर्यंत ते मेघना पेठे यांच्या ‘नातिचरामी’, गौरी देशपांडे यांच्या कांदबऱ्यांमध्येही विनोदाचा वापर हा हत्यारासारखा झाल्याचे दिसतो असल्याचे डॉ. पवार म्हणाल्या.
नंतरच्या काळात महिला कथा, कांदबऱ्यांकडे वळल्याचे दिसते हा साहित्य प्रकारही त्यांनी अगदी तागदीने हाताळल्याचे त्या म्हणाल्या, कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शंकुतला परांजपे, गीता साने यांनी त्यांच्या कांदबऱ्यांमध्ये आपल्या पूर्वाश्रमीच्या स्त्री लेखिकांचा आशय पुढेच नेला नव्हे त्याला अधिक तर्क शुध्द प्रकारच स्वरूप दिल्याचे त्या म्हणाल्या. नामवंत साहित्य लेखकांनी महिलांविषयी आपल्या साहित्यात मांडणी केली असल्याचे सांगून याच काळात महिला साहित्यिकांनी अवगुंठण भिरकावून लिखाण केल्याचे दिसतअसल्याचे डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
कवितेच्या संदर्भाचा विचार करीत असता बहिणाबाई चौधरी ते कल्पना दुधाळ मधल्या टप्प्यावर अनुराधा पाटील या कवयित्रींनी बदलतील कृषीप्रधान व्यवस्था यावर कवितेतून भाष्य कवितेतून केले. प्रभा गाणोरकर, मल्लिका अमरशेख यांनी माहिलांचे होत चालले वस्तुरूप शब्दबद्ध केले असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. आंबेडकरी साहित्यिकांमध्ये कवियत्री मध्ये हिरा बनसोडे, ज्योती लांजेवार, उषा अंभोरे, छाया कोरेगावकर, प्रतिभा अहिरे, आशालता कांबळे, कविता मोरवनकर, कमल गरूड, अभिनया कांबळे, यांनी लिहिलेल्या कवितेतून समग्र व्यवस्थेचा वेध घेतला असल्याचे त्यांनी व्याख्यानात म्हणाले.
पौराणिक, ऐतिहासिक स्त्री पात्रांना ज्या प्रकारे स्त्री लेखिकांनी पाहिले आहे ते ही विशेषच असल्याचे डॉ. पवार म्हणाल्या. यासह महाराष्ट्रातील स्त्री साहित्यात भर घालणा-या मुस्लिम लेखिका, आदिवासी लेखिका, ख्रिस्ती लेखिकांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.महिलांनी लिहिलेल्या साहित्याबाबतीत हवे तसे समीक्षण होत नसल्याचे खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.