पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाचे फलित
चंद्रपूर दि. २० नोव्हेंबर :- नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषदेला ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात मुख्य रस्त्यावरील वाल्मिकी नगरातील स्वागत गेटचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे सदर निधी मंजूर झाला असून या प्रकल्पांतर्गत करण्यात येणारी कामे संबंधित शहराच्या विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याची सुसंगत असल्याची खातरजमा जिल्हाधिकारी यांनी करायची आहे.
मूल शहरात सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारणाच्या प्रकल्पामुळे प्रस्तावित रस्त्यांचे उत्खनन होणार नाही, अशा प्रकारे कामाचे नियोजन करावे. प्रस्तावित रस्त्यांच्या ठिकाणावरील पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाची कामे पूर्ण झाल्यानंतरच सदर रस्त्यांची कामे होतील याची खातर जमा जिल्हाधिकारी यांच्याकडून अपेक्षित आहे.
नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सदर शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. तसेच सदरचे अनुदान ३१ मार्च २०२४ अखेर पर्यंत खर्ची पडेल, याची दक्षता घेण्याचे आध्यदेशात म्हटले आहे. राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेला निधी तात्काळ संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना कोणत्याही प्रकारची कपात न करता वितरित करण्यात यावा, असेही शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.